अफगाणी जनता व लष्करामध्येही तालिबानची दहशत वाढली

  • 24 तासात 13 जिल्ह्यांवर तालिबानचा ताबा
  • कंदहारमध्ये सुरक्षेसाठी शेकडो जणांचे स्थलांतर
  • अफगाणी जवानांनी ताजिकिस्तानात आश्रय घेतला

काबुल – गेल्या चोवीस तासात तालिबानच्या 143 दहशतवाद्यांना ठार केल्याचे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. मात्र अफगाणी जनता आणि लष्करात तालिबानची दहशत वाढल्याचे समोर येत आहे. गेल्या चोवीस तासात तालिबानने अफगाणिस्तानमधील 13 जिल्ह्यांचा ताबा घेतला. या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली नसली तरी तालिबानच्या दहशतीमुळे कंदहार, कुंदूझ, जोवझान प्रांतात शेकडो नागरीकांनी स्थलांतर केल्याच्या बातम्या येत आहेत. तर तालिबानच्या हल्ल्यांमुळे घाबरलेल्या 300 हून अधिक अफगाणी जवानांनी ताजिकिस्तानमध्ये पलायन केले.

तालिबानची दहशतआंतरराष्ट्रीय तसेच अफगाणी संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अफगाणिस्तानातील सुमारे 15 प्रांतांमध्ये लष्कर आणि तालिबान यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. अफगाणिस्तानच्या दक्षिण, पूर्व तसेच ईशान्येकडील भागात तालिबानला जबरदस्त यश मिळत असल्याचे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे. अमेरिका व नाटो लष्कराच्या माघारीच्या वेगाबरोबर तालिबानच्या हल्ल्यांची तीव्रता वाढल्याचा दावा केला जातो. अफगाणिस्तानच्या ईशान्येकडे तालिबानच्या दहशतवाद्यांनी मुसंडी मारली आहे.

गेल्या चोवीस तासात तालिबानने पूर्ण अफगाणिस्तानातील 13 जिल्ह्यांचा ताबा घेतला. यापैकी ईशान्येकडील 11 जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती अफगाणी वृत्तसंस्थेने दिली. एकट्या बादखशान प्रांतातील नऊ जिल्हे तालिबानच्या नियंत्रणाखाली गेले. यापैकी काही जिल्ह्यांचा ताबा कुठल्याही संघर्षाशिवाय मिळाल्याचे तालिबानने जाहीर केले. याबरोबर अफगाणिस्तानातील एकूण 241 जिल्ह्यांपैकी जवळपास निम्म्या जिल्ह्यांवर तालिबानने आपली सत्ता प्रस्थापित केल्याचा दावा केला जातो.

तालिबानची दहशतकाही जिल्ह्यांमध्ये तालिबानची दहशत जाणवू लागल्याच्या बातम्या येत आहेत. तालिबानने कंदहार प्रांतातील पंजवाई जिल्ह्याचा ताबा घेतल्यानंतर येथील शेकडो नागरिकांनी राजधानी कंदहार शहर व आसपासच्या जिल्ह्यांमध्ये धाव घेतली. दहशतवादी या भागाचे तालिबानीकरण करण्याच्या प्रयत्नात असल्याची भीती स्थानिकांमध्ये वाढत आहे. या भीतीने स्थानिक अफगाण सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागांमध्ये आश्रय घेत असल्याचा दावा केला जातो. दोन दिवसांपूर्वी कुंदूझ प्रांतातही अशीच घटना घडली होती.

तर तालिबानच्या हल्ल्यांना घाबरून अफगाणी जवानांनी आपले तळ सोडून पलायन केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. अफगाणिस्तानच्या ईशान्येकडील भागात तालिबानने हल्ला चढविण्याआधीच अफगाणी लष्कराच्या तीनशेहून अधिक जवानांनी ताजिकिस्तानची सीमा ओलांडून आश्रयाची मागणी केली. ताजिक लष्कराने याची माहिती जाहीर केली. काही दिवसांपूर्वी कुंदूझ प्रांतातही अशीच घटना घडली होती. यामुळे ताजिकिस्तानला जोडणारा व्यापारीमार्ग तालिबानच्या हाती पडला आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानात शांती प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानने तालिबानशी चर्चा करावी. अन्यथा अस्थिर अफगाणिस्तान आणि येथील तालिबानच्या राजवटीमुळे पाकिस्तानचेच गंभीर नुकसान होईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय अभ्यासगट, विश्लेषक देत आहेत.

leave a reply