अफगाणिस्तानात तालिबानची मुसंडी

  • दोन महिन्यात 17 जिल्हे तालिबानच्या ताब्यात
  • चार दिवसात शंभरहून अधिक अफगाणी जवान ठार
  • बारा तासांमधील संघर्षात 25 जणांचा बळी

काबुल – तालिबानच्या दहशतवाद्यांनी गेल्या बारा तासात अफगाणिस्तानात चढविलेल्या हल्ल्यांमध्ये 25 जणांचा बळी गेला. यामध्ये काबुलमधील लग्नसमारंभावर झालेल्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या पाच जणांचा समावेश आहे. तर घोर प्रांतात तालिबानने चढविलेल्या हल्ल्यात 20 अफगाणी जवान मारले गेले. गेल्या चार दिवसात दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी गेलेल्या अफगाणी जवानांची संख्या शंभरावर गेली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये तालिबानने अफगाणिस्तानातील 17 जिल्ह्यांचा ताबा घेतल्याची बातमी आली आहे. अमेरिकेची अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरू असताना तालिबानची ही मुसंडी लक्षवेधी ठरते.

अफगाणिस्तानात तालिबानची मुसंडी - दोन महिन्यात 17 जिल्हे तालिबानच्या ताब्यात - चार दिवसात शंभरहून अधिक अफगाणी जवान ठार - बारा तासांमधील संघर्षात 25 जणांचा बळीअफगाणिस्तानात एकूण 403 जिल्हे आहेत. यापैकी 180हून अधिक जिल्ह्यांमध्ये अफगाण लष्कर आणि तालिबान यांच्यात संघर्ष सुरू आहे. तर जवळपास 80 जिल्ह्यांचा तालिबानने ताबा घेतला असून अफगाण सरकारच्या नियंत्रणाखाली अजूनही 130 जिल्हे आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये तालिबानच्या हल्ल्यांची तीव्रता वाढली असून बघलान, बदघीस या प्रांतात अफगाणी लष्करासाठी तालिबानसमोर टिकून राहणे अवघड बनले आहे.

अफगाणी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात तालिबानने तोलाक आणि झारे या जिल्ह्यांचा ताबा घेतला. यापैकी तोलाक येथील संघर्षात अफगाणी लष्कराचे 20 जवान मारले गेले व तितकेच जवान जखमी झाले. याशिवाय तालिबानने 10 जवानांचे अपहरण केल्याची माहिती या वृत्तसंस्थेने दिली. तर झारे जिल्ह्यामध्ये सुरक्षा यंत्रणांना वेळीच सहाय्य न पोहोचल्यामुळे तालिबानने येथे ताबा घेतल्याचे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

अफगाणिस्तानात तालिबानची मुसंडी - दोन महिन्यात 17 जिल्हे तालिबानच्या ताब्यात - चार दिवसात शंभरहून अधिक अफगाणी जवान ठार - बारा तासांमधील संघर्षात 25 जणांचा बळीदोन दिवस आधी अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या प्रांतात झालेल्या संघर्षात 80 अफगाणी जवान आणि 100 तालिबानी मारले गेल्याची बातमी स्थानिक वृत्तसंस्थेने दिली होती. त्यामुळे या संघर्षात अफगाणी जवान मोठ्या प्रमाणात बळी पडत असल्याचे दिसत आहे. तसेच राजधानी काबुलमध्ये एक दिवस आड हल्ले होत आहेत. काबुलच्या पघमान जिल्ह्यात लग्नसमारंभावेळी झालेल्या हल्ल्यात पाच जणांचे अपहरण करून मग त्यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यासाठी तालिबान जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक पोलीस अधिकार्‍यांनी केला. अफगाणी लष्कराकडूनही तालिबानला उत्तर दिले जात आहे. अफगाणी संरक्षण मंत्रालयाने, गेल्या चोवीस तासात 14 प्रांतात केलेल्या कारवाईत तालिबानच्या 152 जणांना ठार केल्याचा दावा केला.

दरम्यान, तालिबानने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नाटोच्या सदस्य देशांना नव्याने इशारा दिला. अफगाणिस्तानातील विमानतळ आणि दूतावासांच्या सुरक्षेची जबाबदारी अफगाणींची असून परदेशी लष्कराने अफगाणिस्तानात थांबू नये, असे तालिबानने बजावले. अमेरिका व नाटोच्या सैन्यमाघारीनंतर काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेसाठी अफगाणिस्तानात आपले जवान तैनात ठेवण्याचा प्रस्ताव तुर्कीने दिला होता. मात्र नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कीला तशी संधी दिली जाणार नाही, हे तालिबानने पुन्हा एका स्पष्ट केले आहे.

leave a reply