तालिबानवरचे निर्बंध कायम ठेवल्यास अमेरिका, युरोपात निर्वासितांचे लोंढे सोडू

- तालिबानची धमकी

काबुल/न्यूयॉर्क – ‘तालिबानच्या राजवटीला कमकुवत करणे कुणाच्याही हिताचे नाही. कारण अफगाणिस्तानातील निर्वासितांचे लोंढे पाश्‍चिमात्य देशांच्या दिशेने निघाले तर याचे थेट नकारात्मक परिणाम जागतिक सुरक्षा आणि आर्थिक क्षेत्रावर होईल’, अशी धमकी तालिबानचा हंगामी परराष्ट्रमंत्री अमिर खान मुत्ताकी याने दिली. हे टाळायचे असेल तर आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानसाठी आर्थिक सहाय्य सुरू करावे, असे तालिबान धमकावत आहे. पण आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणींसाठी आर्थिक सहाय्य सुरू केले तर त्याचा फायदा ‘हक्कानी नेटवर्क’ या पाकिस्तान संलग्न दहशतवादी संघटनेला होईल, असा इशारा अमेरिकन सिनेटचे सदस्य देत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कतारची राजधानी दोहा येथे तालिबान पाश्‍चिमात्य देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करीत आहे. परराष्ट्रमंत्री मुत्ताकी हा तालिबानचे नेतृत्व करीत असून गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या प्रतिनिधींबरोबरही मुत्ताकीने चर्चा केली. या चर्चेतही अफगाणिस्तानातील तालिबानची राजवट अस्थिर करणे कुणाच्याही हिताचे नसेल, असे मुत्ताकीने धमकावले होते. तर काही तासांपूर्वी युरोपिय महासंघाच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत तालिबानने याहून गंभीर इशारा दिला.

‘सर्व देशांनी तालिबानवरील निर्बंध काढून टाकून अफगाणिस्तानातील बँका सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करावे. आंतरराष्ट्रीय निधी येत राहिला तर अफगाणिस्तानातील सरकारी कर्मचार्‍यांना वेतन देता येईल’, असा दावा मुत्ताकी याने केला. पण निर्बंध काढण्याची मागणी करीत असताना तालिबानने युरोपिय देशांवर अफगाणी निर्वासितांचे लोंढे सोडण्याची धमकी दिली आहे.

अमेरिकेपेक्षा युरोपिय देश अफगाणी निर्वासितांच्या लोंढ्यांमुळे घाबरलेले असल्याचा दावा केला जातो. कारण गेली काही वर्षे इराक-सिरियातील संघर्ष आणि आफ्रिकेतील हिंसाचार, अस्थैर्य व अराजकामुळे लाखो निर्वासितांचे लोंढे युरोपमध्ये धडकले आहेत. याचे दुष्परिणाम युरोपच्या जनजीवनावर होत असल्याचे समोर आले आहे.

तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यानंतर गेल्या दोन महिन्यांमध्ये शेजारी देशांच्या मार्गाने युरोपसाठी निघालेले निर्वासितांचे लोंढे तुर्कीजवळ धडकत असल्याच्या बातम्या येत आहेत. तुर्कीने या निर्वासितांना स्वीकारणार नसल्याचे सांगून त्यांना युरोपिय देशांवर सोडण्याचा इशारा दिला आहे. तर सध्या इराण, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान व पाकिस्तानच्या सीमेवर देखील अफगाणी निर्वासितांचे लोंढे हजारोंच्या संख्येने जमा झालेले आहेत. अशा परिस्थितीत तालिबानने हे लोंढे युरोपिय देशांवर सोडण्याची धमकी दिली आहे.

‘अमेरिका किंवा आंतरराष्ट्रीय समुदायाने मानवतावादी सहाय्य म्हणून अफगाणिस्तानला आर्थिक मदत दिली तर सदर सहाय्य अफगाणींपर्यंत पोहोचेल, अशा भ्रमात राहू नका’, असा खरमरीत इशारा अमेरिकन सिनेटर माईक वॉल्ट्झ यांनी दिला. ‘काबुलवर ताबा असलेल्या हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेला या आर्थिक सहाय्याचा फायदा होईल. याआधीही हक्कानी नेटवर्कने आंतरराष्ट्रीय सहाय्य पळविले होते’, याची आठवण याआधी अफगाणिस्तानात तैनात असलेल्या सिनेटर वॉल्ट्झ यांनी अमेरिकन सिनेटला करुन दिली आहे.

leave a reply