युद्धगुन्ह्यांसाठी तालिबानला जबाबदार धरले जाईल

- संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांचा इशारा

तालिबानला जबाबदारसंयुक्त राष्ट्र – ‘अफगाणिस्तानातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांनी जनतेवर चढविलेले हल्ले म्हणजे युद्धगुन्हे आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार नियमांचे गंभीर उल्लंघन ठरते. यासाठी तालिबानला जबाबदार धरले जाईल’, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरस यांनी दिला. त्याचबरोबर तालिबानने हा संघर्ष थांबवून अफगाणिस्तानच्या गनी सरकारशी चर्चा सुरू करावी, असे आवाहन गुतेरस यांनी केले.

गेल्या महिन्याभरात तालिबानने अफगाणिस्तानात केलेल्या हल्ल्यांमध्ये एक हजाराहून अधिक अफगाणी जनतेचा बळी गेल्याचा दावा केला जातो. यामध्ये हेल्मंड, कंदहार आणि हेरात प्रांतातील नागरिकांचा समावेश आहे. तर तालिबानच्या भीतीमुळे किमान दोन लाख 41 हजार अफगाणींनी पलायन केले. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव गुतेरस यांनी शुक्रवारी अफगाणिस्तानातील या घडामोडींवर चिंता व्यक्त केली. ‘संघर्षाच्या पिढ्या पाहिलेल्या अफगाणिस्तानलाही अराजकतेच्या दिशेने सुरू असलेला सध्याचा संघर्ष पाहणे अवघड बनले असेल. अफगाणिस्तानातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे’, असे गुतेरस म्हणाले.

तालिबानला जबाबदार‘लष्करी सामर्थ्याच्या जोरावर राजवट बळकाविल्यास तालिबानला स्वीकृती मिळणार नाही, असा स्पष्ट संदेश आंतरराष्ट्रीय समुदायाने देणे आवश्‍यक आहे. या संघर्षामुळे अफगाणिस्तान प्रदिर्घ गृहयुद्धात ढकलला जाईल किंवा अफगाणिस्तान बहिष्कृत होईल’, असा इशारा गुतेरस यांनी दिला. अफगाणिस्तानच्या शहर, गाव आणि प्रांतांचा ताबा घेणारे तालिबानचे दहशतवादी जनतेवर कठोर निर्बंध लादून मानवाधिकारांचे उल्लंघन करीत असल्याचा उल्लेख राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी केला. विशेषत: महिला, मुली आणि पत्रकारांवर तालिबान करीत असलेल्या अत्याचारांवर गुतेरस यांनी टीका केली.

त्याचबरोबर तालिबानने संघर्ष थांबविणे हे अफगाणिस्तान आणि जनतेच्या भल्याचे आहे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी केले. यासाठी तालिबानने दोहा येथील वाटाघाटींमध्ये ठरलेल्या नियमांचे पालन करावे, असे गुतेरस यांनी सांगितले. पण वेगाने अफगाणिस्तानचा ताबा घेत सुटलेले तालिबानचे दहशतवादी आंतरराष्ट्रीय संघटना किंवा समुदायाचे ऐकण्याच्या तयारीत नाहीत, असा दावा केला जातो.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये तालिबाने आपल्या लष्करी सामर्थ्यात वाढ केल्याचा दावा पाकिस्तानातील माध्यमे करीत आहेत. अमेरिकेने अफगाणी लष्कराला पुरविलेले ‘इगल ड्रोन्स’ त्याचबरोबर ‘एमआय-8’, ‘एमआय-17’ हेलिकॉप्टर्स ताब्यात घेतले आहेत. यापैकी अफगाणी लष्कराच्या हेलिकॉप्टर्सचा वापर तालिबान करू शकतात. यासाठी तालिबानकडे प्रशिक्षित वैमानिक असल्याचे पाकिस्तानी माध्यमांचे म्हणणे आहे. तर अमेरिकेचे इगल ड्रोन्स तालिबान चीनला पुरवून त्यामोबदल्यात शस्त्रास्त्रे मिळवतील, असेही बोलले जाते.

leave a reply