तालिबान महिन्याभरात काबुलची कोंडी करील

- अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेची भीती

काबुलची कोंडीवॉशिंग्टन/काबुल – अफगाणिस्तानच्या लष्कराने गेल्या चोवीस तासात केलेल्या कारवाईत तालिबानच्या ४३९ दहशतवाद्यांना संपविले. तर या चोवीस तासात तालिबानने अफगाणिस्तानच्या तीन प्रांतांच्या राजधान्यांचा ताबा घेतला आहे. गेल्या सहा दिवसात आठ प्रांतांच्या राजधान्या तालिबानच्या हाती पडल्या असून ही अफगाणिस्तानच्या सरकारसह अमेरिकेसाठीही चिंतेची बाब ठरते. तालिबानच्या कारवायांचा वेग पाहता, येत्या महिन्याभरात ही दहशतवादी संघटना राजधानी काबुलला अफगाणिस्तानपासून वेगळे पाडेल व पुढील तीन महिन्यात काबुलचा ताबा घेईल, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिला आहे.

काबुलवर ताबा मिळविण्यासाठी तालिबानला सहा किंवा त्याहून अधिक महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे अमेरिकी गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे होते. पण गेल्या काही आठवड्यांमध्ये तालिबानला मिळालेल्या यशावर अमेरिकी गुप्तचर यंत्रणेनेही गंभीर चिंता व्यक्त केली आहे. गेल्या चोवीस तासात बडाखशान, फराह आणि कुंदूझ प्रांतांच्या राजधान्या तालिबानने ताब्यात घेतल्या आहेत. यापैकी बडाखशान आणि कुंदूझमधील यश ही तालिबानला आत्तापर्यंत मिळालेली सर्वात मोठी आघाडी असल्याचे मानले जाते. अफगाणिस्तानच्या गनी सरकारसाठी मोठा धक्का असल्याचाही दावा केला जातो.

राजधानी कुंदूझचा ताबा घेतल्यानंतर तालिबानच्या दहशतवाद्यांनी येथील लष्करी विमानतळावरील ‘एमआय-३५ हिंद’ या हेलिकॉप्टरबरोबरचे आपले फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले आहेत. दोन वर्षांपूर्वी भारताने अफगाणिस्तानच्या लष्कराला सदर हेलिकॉप्टर्स भेट म्हणून दिले होते. कुंदूझ येथील संघर्षात अफगाणी जवानांनी तालिबानच्या दहशतवाद्यांसमोर शरणांगती पत्करल्याच्या बातम्या आहेत. पण अफगाणी सरकार तसेच लष्कराने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

काबुलची कोंडीबडाखशानची राजधानी फैझाबादवरील तालिबानच्या नियंत्रणानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी तातडीने मझार-ए-शरीफमध्ये दाखल झाले आहेत. तालिबानविरोधी कारवाईबाबत राष्ट्राध्यक्ष गनी आणि अफगाणिस्तानातील टोळीप्रमुख व या देशाचे माजी उपराष्ट्राध्यक्ष रशिद दोस्तम यांच्यात या ठिकाणी चर्चा होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मंगळवारी केलेल्या घोषणेच्या पार्श्‍वभूमीवर, गनी आणि दोस्तम यांच्यात ही बैठक होत असल्याचा दावा केला जातो.

अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या वेगवान सैन्यमाघारीमुळे तालिबानने मुसंडी मारल्याचे पत्रकारांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना लक्षात आणून दिले. यावर प्रतिक्रिया देताना, सैन्यमाघारीच्या निर्णयावर आपल्याला अजिबात पश्‍चाताप होत नसल्याचे बायडेन म्हणाले. तसेच गेल्या २० वर्षाच्या संघर्षात अमेरिकेने अफगाणिस्तानातील संघर्षात ट्रिलियन डॉलर्स खर्च केले, हजारो अमेरिकी जवानांना गमावल्याची आठवण बायडेन यांनी करून दिली. तसेच तालिबानच्या तुलनेत अफगाणी जवानांची संख्या मोठी असून त्यांनीच तालिबानशी लढा द्यावा, असे बायडेन म्हणाले.

या पार्श्‍वभूमीवर, तालिबानविरोधी कारवाई तीव्र करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष गनी आणि दोस्तम यांच्यात भेट होत असल्याचे अफगाणी माध्यमांचे म्हणणे आहे. या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष गनी यांनी लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल अहमदझाई यांच्या जागी जनरल हैबतुल्ला अलीझाई यांना नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्त केले. दरम्यान, अफगाणिस्तानसह आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरणार्‍या तालिबानविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाने एकजूट करून तालिबानवर निर्बंध लादावे, असे आवाहन अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री हनिफ अत्मार यांनी केले.

leave a reply