अफगाणिस्तानवरील तालिबानचा ताबा जगभरातील कट्टरपंथियांना उत्तेजन देणारा

- अमेरिकेच्या सेंटकॉमच्या प्रमुखांचा इशारा

कट्टरपंथियांना उत्तेजनअबू धाबी – ‘तालिबानने अफगाणिस्तानचा घेतलेला ताबा ही जगभरातील कट्टरपंथियांना उत्तेजन देणारी बाब ठरते. अमेरिकेने याकडे अतिशय सावधपणे पहावे’, असा इशारा अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड-सेंटकॉम’चे प्रमुख जनरल केनिथ मॅक्केन्झी यांनी दिला. २०१४ साली अमेरिकेने इराकमधून माघार घेतल्यावर आयएस ही दहशतवादी संघटना इराकमध्ये उदयाला आली होती, याची आठवण करून देऊन जनरल मॅक्केन्झी यांनी बायडेन प्रसासनाला अफगाणिस्तानबाबत सावधानतेचा इशारा दिला.

अमेरिकेने अफगाणिस्तानातून घिसाडघाईने घेतलेल्या सैन्यमाघारीवर जोरदार टीका होत आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप केला जातो. अमेरिकेच्या सेंटकॉमचे प्रमुख जनरल मॅक्केन्झी यांनी युएईतील वृत्तसंस्थेशी बोलताना अफगाणिस्तानात सैन्यमाघारीचा निर्णय चुकल्याचे मान्य केले. तसेच नेमके कुठे चुकले, यावर अमेरिका सखोल अभ्यास करणार असल्याची माहिती जनरल मॅक्केन्झी यांनी दिली.

त्याचबरोबर अफगाणिस्तानातून पूर्ण सैन्यमाघार घेण्याची आवश्यकता नव्हती, हे जनरल मॅक्केन्झी यांनी अप्रत्यक्षरित्या मान्य केले. ‘अमेरिकेने २०१४ साली इराकमधून आणि २०२१ मध्ये अफगाणिस्तानातून घेतलेली वेगवान माघार, यातून अमेरिकेला दोन मोठे धडे मिळाले आहेत. २०१४ सालच्या सैन्यमाघारीनंतर इराकमधील लष्कर कोसळले आणि आयएसने इराकमध्ये घुसखोरी केली. आज इराकमध्ये अमेरिकेचे थोडे जवान तैनात आहेत. पण यामुळे इराकी लष्कराला आयएसविरोधात कारवाईत यश मिळत आहे’, असे सांगून जनरल मॅक्केन्झी यांनी अफगाणिस्तानातील पूर्ण माघारीनंतर नव्या दहशतवादी संघटनेचा उदय होण्याची चिंता व्यक्त केले.

कट्टरपंथियांना उत्तेजनअफगाणिस्तानला दहशतवाद्यांचे केंद्र बनू देणार नसल्याचे तालिबानने दोहा बैठकीत मान्य केले होते. पण तालिबानच्या शब्दांवर विश्‍वास ठेवता येणार नाही, असे मॅक्केन्झी म्हणाले. तालिबानने अल कायदाबरोबर संबंध तोडल्याचे किंवा आयएसला ठासल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, असे सांगून सेंटकॉमच्या प्रमुखांनी तालिबानवर करडी नजर असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेतली असली तरी अमेरिका अजूनही या क्षेत्रात असल्याचे सूचक उद्गार जनरल मॅक्केन्झी यांनी काढले आहेत.

अमेरिकेने अफगाणिस्तानातून पूर्ण माघार घेऊ नये, अशी स्पष्ट भूमिका जनरल मॅक्केन्झी यांनी फार आधी मांडली होती. अफगाणिस्तानातील अमेरिकेचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी छोट्या संख्येने सैन्यतैनाती आवश्यक असल्याचे मॅक्केन्झी त्यावेळी म्हणाले होते. गेल्या महिन्यात सिनेटच्या सुनावणीतही सेंटकॉमच्या प्रमुखांनी आपली भूमिका परखडपणे मांडली होती.

leave a reply