भारत-जपानच्या लष्कर प्रमुखांमध्ये फोनवरून चर्चा

नवी दिल्ली – सोमवारी भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे आणि जपानचे संरक्षणदलप्रमुख जनरल ‘गोरो युआसा’ यांच्यात फोनवरुन चर्चा पार पडली. खुल्या ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रासाठी भारत आणि जपानचे लष्करी सहकार्य दृढ करण्यावर उभय देशांच्या प्रमुखांचे एकमत झाले. ‘इंडो- पॅसिफिक’क्षेत्रात चीनची दादागिरी वाढत असताना भारत आणि जपानचे या क्षेत्रातील वाढते सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.

‘इंडो- पॅसिफिक’क्षेत्रात हिंदी महासागर, ‘साऊथ चायना सी’, पश्चिम आणि मध्य पॅसिफिक’चा समावेश होतो. हिंदी महासागरात चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. तर ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रावर आपला हक्क सांगून चीन इथे दादागिरी करीत आहे. पण आग्नेय आशियाई देशांनी या क्षेत्रात चीनविरोधात आघाडी उभी केली आहे. जपानने या क्षेत्रात भारताने आपली भूमिका पार पाडावी, असे प्रथम म्हटले होते. त्यानंतर भारत आणि जपानमधील सहकार्य सातत्याने वाढत आहे. आता भारत आणि जपानचे संरक्षणदल या क्षेत्रातील सहकार्य वाढवून चीनविरोधात उभे ठाकले आहेत.

दरम्यान, गेल्याच आडवड्यात भारत आणि जपानमध्ये लॉजिस्टिक्स करार पार पडला होता. यानुसार उभय देश परस्परांचे लष्करी तळ वापरु शकतात. या पार्श्वभूमीवर भारत आणि जपानच्या संरक्षणदलप्रमुख व लष्करप्रमुखांमध्ये पार पडलेली ही चर्चा लक्ष वेधून घेणारी ठरते. तसेच लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये तणाव वाढलेला असताना, भारत आणि जपानमध्ये पार पडलेल्या या चर्चेला विशेष महत्त्व आले आहे.

leave a reply