नव्या निर्बंधांच्या घोषणेनंतर रशिया व युरोपिय महासंघामधील तणाव चिघळला

मॉस्को/बु्रसेल्स – सोमवारी युरोपिय महासंघाने ‘अ‍ॅलेक्सी नॅव्हॅल्नी’ प्रकरणात रशियावर नवे निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला. नॅव्हॅल्नी प्रकरणावरून महासंघाने रशियाविरोधात निर्बंधांची घोषणा करण्याची ही दुसरी वेळ आहे. या निर्णयावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, युरोपिय महासंघाने संबंध सुधारण्याची अजून एक संधी गमावली आहे, अशी टीका रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. दरम्यान, युरोपिय महासंघापाठोपाठ अमेरिकेनेही नॅव्हॅल्नी प्रकरणावरून रशियावर निर्बंध लादण्याचा इशारा दिला असून येत्या काही दिवसात त्याची घोषणा होईल, असे संकेत बायडेन प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे कडवे विरोधक असणार्‍या अ‍ॅलेक्सी नॅव्हॅल्नी यांच्यावर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात प्राणघातक विषप्रयोग झाला होता. नॅव्हॅल्नी यांच्यावरील या विषप्रयोगासाठी रशियन सरकार जबाबदार असल्याचा आरोप झाला होता. गेल्या महिन्यात नॅव्हॅल्नी रशियात माघारी आल्यानंतर त्यांना तातडीने अटक करून तुरुंगात धाडण्यात आले होते. त्याविरोधात नॅव्हॅल्नी यांच्या समर्थकांनी व्यापक आंदोलन छेडले होते. रशियातील प्रमुख शहरांसह कानाकोपर्‍यातून हजारो रशियन नागरिक नॅव्हॅल्नी यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळाले होते.

मात्र रशियन सरकारने निदर्शकांविरोधात कडक भूमिका घेतली होती. नॅव्हॅल्नी यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करणार्‍या ११ हजारांहून अधिक निदर्शकांवर कारवाई करण्यात आली होती. त्याचवेळी अ‍ॅलेक्सी नॅव्हॅल्नी यांच्यावर नवा खटला दाखल करून रशियन न्यायालयाने दोन वर्षे आठ महिन्यांची शिक्षाही सुनावली होती. निदर्शकांवर केलेली कारवाई व नॅव्हॅल्नी यांना सुनावलेली नवी शिक्षा या मुद्यावरून अमेरिका तसेच युरोपिय महासंघ आक्रमक झाला आहे. सोमवारी महासंघाने निर्बंध लादण्याबाबत घेतलेला निर्णय व त्यापाठोपाठ अमेरिकेने दिलेले संकेत याच आक्रमकतेचा भाग मानला जातो.

‘नॅव्हॅल्नी यांच्यावर कारवाईसाठी जबाबदार असणार्‍यांवर निर्बंध लादण्याच्या मुद्यावर युरोपिय महासंघाचे एकमत झाले आहे. रशिया हा हुकुमशाही राजवटीकडे झुकू लागला असून युरोपपासून दूर जात आहे. रशियन राजवटीने संबंध तोडण्याचा व संघर्षाचा मार्ग पत्करल्याचे दिसत आहे’, अशा शब्दात युरोपिय महासंघाचे परराष्ट्र प्रमुख जोसेप बॉरेल यांनी निर्बंधांची घोषणा केली. महासंघ चार मोठ्या रशियन अधिकार्‍यांविरोधात निर्बंध लादणार असून, त्यात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे निकटवर्तिय असणार्‍या बड्या उद्योजकांचाही समावेश असू शकतो, असे संकेतही बॉरेल यांनी दिले आहेत.

रशियन राजवटीकडून नॅव्हॅल्नी यांचा सातत्याने छळ होत असून त्याविरोधात आता युरोप गप्प बसणार नाही, या शब्दात जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हैको मास यांनी रशियाविरोधातील निर्बंधांचे समर्थन केले. रशियाबरोबरील युरोपचे संबंध खालावले असल्याची कबुलीही जर्मन मंत्र्यांनी दिली. युरोपिय महासंघाकडून लादण्यात येणार्‍या निर्बंधांमध्ये मालमत्ता गोठविणे व व्हिसा बॅन या कारवाईचा समावेश असेल, असे संकेत युरोपिय महासंघाच्या अधिकार्‍यांनी दिले आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातही युरोपिय महासंघाने नॅव्हल्नी यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाच्या प्रकरणात रशियाविरोधात निर्बंध लादले होते.

महासंघाने लादलेल्या निर्बंधांविरोधात रशियाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘युरोपिय महासंघाने रशियाबरोबर संबंध सुधारण्याची अजून एक संधी गमावली आहे. त्याऐवजी निर्बंध व दडपण टाकणे हाच युरोपिय महासंघाच्या रशिया धोरणाचा आधार राहिल, असे दिसत आहे. युरोपने रशियाविरोधात पुन्हा एकदा आधीच बिघडलेल्या निर्बंधांच्या बटणाचा वापर केला आहे. महासंघाची कारवाई तर्काला धरून नसून हा एक राजकीय निर्णय आहे. या निर्णयाचा मानवाधिकारांशी काहीही संबंध नाही. महासंघाची कृती अस्वीकारार्ह व बेकायदेशीर असून एका सार्वभौम देशाच्या अंतर्गत कारभारात केलेला उघड हस्तक्षेप ठरतो’, अशा शब्दात रशियन परराष्ट्र मंत्रालयाने महासंघावर जळजळीत टीकास्त्र सोडले. रशियाने नॅव्हॅल्नी यांच्या सुटकेची मागणीही स्पष्ट शब्दात फेटाळून लावली आहे.

leave a reply