‘डीआर काँगो’तील दहशतवादी हल्ल्यात ४६ जणांचा बळी

किन्शासा – आफ्रिकेतील ‘डीआर काँगो’मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान ४६ जणांचा बळी गेला आहे. ‘डीआर काँगो’च्या पूर्व भागातील ‘इरुमु’नजिक हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येते. हल्ल्यामागे ‘आयएस’ व ‘अल कायदा’ या दोन्ही दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय असणार्‍या ‘एडीएफ’ या गटाचा हात असल्याचे मानले जाते. १५ दिवसांत झालेला हा दुसरा मोठा हल्ला ठरला आहे. गेले दोन महिने ‘डीआर काँगो’त सातत्याने हल्ले सुरू असून आफ्रिकेत कट्टरपंथी दहशतवादी संघटना प्रबळ होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

दहशतवाद्यांच्या गटाने गुरुवारी इरुमुमधील एका गावावर हल्ला चढविल्याची माहिती स्थानिक अधिकार्‍यांनी दिली. हल्ल्यात बळी गेलेले नागरिक ‘पिग्मी’ वंशाचे असल्याचे सांगण्यात येते. हल्ल्यात काही जण गंभीर जखमी असून बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हल्ल्यानंतर लष्करी पथक गावात दाखल झाले असून हल्लखोरांचा तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘डीआर काँगो’च्या लष्कराकडून ‘एडीएफ’विरोधात आक्रमक मोहीम सुरू असतानाही हा हल्ला झाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून या भागात सातत्याने हल्ले सुरू असून नव्या हल्ल्याने लष्कर तसेच सुरक्षायंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे आरोप करण्यात येत आहेत. इतर आफ्रिकी देशांप्रमाणे ‘डीआर काँगो’लाही कोरोनाचा फटका बसला असून साथ रोखण्यासाठी सरकारकडून मोहीम सुरू आहे. मात्र दहशतवादी तसेच बंडखोर संघटनांकडून होणार्‍या हल्ल्यांमुळे त्यात अडथळे येत आहेत. गेल्या वर्षी ‘डीआर काँगो’तील दहशतवादी तसेच बंडखोरांकडून ‘एबोला’विरोधातील मोहिमसाठी उभारण्यात आलेल्या केंद्रांना तसेच त्यावर काम करणार्‍या स्वयंसेवकांना लक्ष्य करण्यात आले होते.

‘एडीएफ’ ही युगांडा व ‘डीआर काँगो’मध्ये सक्रिय असणार्‍या प्रमुख दहशतवादी संघटनांपैकी एक म्हणून ओळखली जाते. दोन्ही देशांच्या लष्करांनी राबविलेल्या मोहिमेत या दहशतवादी संघटनेची ताकद कमी झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र गेल्या काही महिन्यात हल्ले पुन्हा वाढत असून संघटना प्रबळ होत असल्याचे मानले जाते. गेल्या दोन वर्षात या संघटनेने चढविलेल्या हल्ल्यांमध्ये हजारांहून अधिक नागरिकांचा बळी गेल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघटनेने दिली आहे.

आफ्रिका खंडातील सर्वाधिक खनिजसंपत्ती असणार्‍या देशांमध्ये ‘डीआर काँगो’चा समावेश होतो. सुमारे नऊ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या या देशात कोबाल्ट, तांबे, हिरे व ‘कोल्टन’च्या मोठ्या खाणी आहेत. एका अहवालानुसार, या देशात जवळपास २४ ट्रिलियन डॉलर्स इतक्या प्रचंड प्रमाणात खनिजसंपत्ती आहे.

leave a reply