दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

- चार दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने शनिवार चार दहशतवाद्यांना अटक करत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. चारही जण काश्मिरी असून या दहशतवाद्यांकडून चार अत्याधुनिक पिस्तूल, १२० काडतुसे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. हे दहशतवादी अल-कायदाशी संबंधित काश्मीरमध्ये कार्यरत ‘अन्सार गजवात-अल-हिंद’ या संघटनेचे असल्याचे वृत्त आहे.

हल्ल्याचा कट

दिल्ली पोलिसांना दहशतवाद्यांबद्दल खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यामुळे आधीपासूनच आयकर कार्यालयाच्या परिसरात सापळा रचण्यात आला होता. येथे पोहोचलेल्या दहशतवाद्यांना पोलिसांची चाहूल लागताच येथून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा पाठलाग करीत रिंगरोड भागातून या दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याचे स्पेशल सेलचे डीसीपी पीएस कुशवाह म्हणाले.

पुलवामा येथील रहिवासी अल्ताफ अहमद दर (२५ वर्ष ), शोपियनमधील रहिवासी असलेल्या मुश्ताक अहमद गनी (२७), इश्फाक माजिद कोका (वय २२) आणि अकीब सफी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. २७ सप्टेंबर रोजी हे सर्वजण दिल्लीत आले होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची जमवा जमाव केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी इश्फाक माजिद कोका हा ठार मारण्यात आलेला दहशतवादी बुरहाण कोकाचा लहान भाऊ आहे. बुरहाण कोका जम्मू-काश्मीरमधील ‘अन्सार गजवात-अल-हिंद’ या दहशतवादी संघटनेचा माजी प्रमुख होता. यावर्षी २९ एप्रिल रोजी सुरक्षादलांबरोबर झालेल्या चकमकीत त्याला मारण्यात आले होते. त्याला ठार मारण्यात आल्यानंतर ‘अन्सार गजवात-अल-हिंद’च्या सदस्यांनी इश्फाक मजीद कोका याला दहशतवादी संघटनेसाठी काम करण्यासाठी संपर्क साधला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

leave a reply