पाणबुडीविरोधी युद्धात गेम चेंजर ठरणाऱ्या ‘स्मार्ट’ची चाचणी

नवी दिल्ली – पाणबुडीविरोधी युद्धामध्ये ‘गेम चेंजर’ ठरू शकणाऱ्या ”सुपरसॉनिक मिसाइल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पेडो’ (स्मार्ट ) यंत्रणेची ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’तर्फे (डीआरडीओ)यशस्वी चाचणी घेण्यात आली. ‘स्मार्ट’मुळे भारतीय नौदलाच्या क्षमतेत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. चीनकडून आपल्या नौदलाच्या क्षमतेत सातत्याने वाढ करण्यात येत आहे. चीनच्या नौदलाच्या ताफ्यात ७० हून अधिक पाणबुड्या असून या पाणबुड्याच चिनी नौदलाची ताकद मानली जातात. यापार्श्वभूमीवर भारत पाणबुडीविरोधी युद्धतंत्राची आपली क्षमता विस्तारत आहे. यावरून ‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या ‘स्मार्ट’चे महत्व अधोरेखित होते.

'स्मार्ट'

सोमवारी ओडिशाच्या व्हीलर बेटावरून ११ वाजून ४५ मिनिटांनी ‘स्मार्ट’ची यशस्वी चाचणी पार पडली. या यंत्रणेतून टॉर्पेडो सोडणे आणि व्हेलॉसिटी रिडक्शन मेकॅनिझम (व्हीआरएम) व्यवस्थित कार्य करीत आहे का, ही चाचणी घेण्यामागील निश्चित केलेली उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत. या चाचणीवर रडार्स, इलेक्ट्रो ऑप्टिकल कार्यप्रणाली आणि टेलिमेट्री स्टेशनद्वारे देखरेख ठेवण्यात आली. युद्धाच्या प्रसंगी शत्रूच्या पाणबुड्या नष्ट करण्याची क्षमता ‘स्मार्ट’ यंत्रणेत असल्याने ही चाचणी महत्वाची ठरते.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘डीआरडीओ‘च्या संशोधकांचे या यशस्वी चाचणीनंतर अभिनंदन केले. ”डीआरडीओने ‘स्मार्ट’ ची यशस्वी चाचणी केली आहे. ही यंत्रणा युद्धाच्या वेळी शत्रूच्या पाणबुड्या नष्ट करण्याची आपली क्षमता वाढवेल. या महान कामगिरीबद्दल मी डीआरडीओ आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो”, असे राजनाथ सिंग म्हणाले. हैद्राबादच्या डीआरडीएल, आरसीआय, आग्रा इथल्या एडीआरडीई, विशाखापट्टणमच्या एनएसटीएल या डीआरडीओच्या प्रयोगशाळांमधून ‘स्मार्ट’साठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेआहे. पाणबुडी युद्धामध्ये ‘स्मार्ट’ हे ‘गेम चेंजर’ तंत्रज्ञान ठरेल असा विश्वास डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी यांनी व्यक्त केला.

‘डीआरडीओ‘कडून नुकतीच ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राच्या विकसित आवृत्तीची, त्यानंतर अण्वस्त्रवाहू ‘शौर्य’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यासह स्वदेशी बनावटीच्या ”लेझर गाइडेड अँटी टॅंक क्षेपणास्त्रा”ची (एटीजीएम) यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. मागील काही दिवसात डीआरडीओ‘कडून घेण्यात आलेल्या या चाचण्यांमुळे देशाच्या संरक्षण सिद्धतेत वाढ होणार आहे. भारत चीनबरोबरील तणावाच्या पार्श्ववभूमीवर डीआरडीओ‘कडून घेण्यात आलेल्या या चाचण्या महत्वाच्या ठरतात.

leave a reply