देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४४ लाखांच्या पुढे

नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या बळींची संख्या ७४ हजार ३०० वर आणि रूग्णांची संख्या ४४ लाखांच्या पुढे गेली आहे. देशात दर दिवशी आढळत असलेल्या सुमारे ९० हजार कोरोनाच्या नव्या रुग्णांपैकी साठ टक्के रूग्णांची नोंद केवळ पाच राज्यांमध्ये होत आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूचा समावेश आहे. बुधवारी या पाच राज्यांमध्ये ७२६ जणांचा बळी गेला आणि ५२,३४४ नवे रूग्ण आढळले. तसेच पश्चिम बंगाल, जम्मू- काश्मीर, तेलंगणा, दिल्ली या राज्यांमध्ये चोवीस तासात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा उच्चांक नोंदवण्यात आला.

४४ लाखांच्या पुढे

जगात कोरोनाच्या साथीमुळे बळी गेलेल्यांची संख्या ९ लाखांच्या पुढे गेली आहे, तसेच आतापर्यंत २ कोटी ७७ लाख ७२ हजार कोरोना रूग्णांची नोंद जगभरात झाली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्ये बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात सध्या जगातील इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत दर दिवशी कितीतरी जास्त रूग्णांची नोंद होत आहे. गेल्या चार दिवसांपासून दरदिवशी सुमारे ९० हजार रूग्ण आढळत आहेत. तसेच दिवसाला हजारांहून अधिक रुग्णांचे बळी या साथीमुळे जात आहेत.

बुधवारी या साथीने महाराष्ट्रात ३८० जणांचा बळी गेला आणि २०,१३१ नवे रूग्ण आढळले. आंध्र प्रदेशात ७४ जण दगावले आणि १०, ४१८ नव्या रूग्णांची नोंद झाली. कर्नाटकात एका दिवसात कोरोनाने १४८ जणांचा मृत्यू झाला आणि ९,५४० नवे रूग्ण सापडले. बुधवारी उत्तर प्रदेशात ६६ जणांचा बळी गेला आणि ६,७११ नवे रूग्ण आढळले. तामिळनाडूत ७८ जण दगावले आणि ५,५८४ नव्या रूग्णांची नोंद झाली.

याशिवाय दिल्लीत ४ हजार, पश्चिम बंगाल मध्ये ३,८१७, झारखंडमध्ये २५५२ आणि जम्मू-काश्मीर मध्ये १६१७ नवे रूग्ण आढळले आहेत. दरम्यान देशात आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या ५ कोटींच्यावर पोहोचली आहे. तसेच देशातील कोरोनाचे रूग्ण बरे होण्याचा दर ७७.७७ टक्क्यांवर गेला आहे. या साथीचे ३४ लाख रूग्ण आतापर्यंत बरे झालेले आहेत.

दरम्यान, अमेरिकेतील या साथींच्या बळींची संख्या एक लाख ९४ हजारांवर आणि रुग्णांची संख्या ६५ लाख ५० हजारांवर पोहोचली आहे. ब्राझीलमधील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १ लाख २८ हजारांवर, तर रुग्णांची संख्या ४१ लाख ७९ हजारांच्या पुढे गेली आहे.

leave a reply