ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारत भेटीचे निमंत्रण स्वीकारले

लंडन/नवी दिल्ली – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. पुढचे वर्ष ग्लोबल ब्रिटनची सुरुवात असून भारताला भेट देण्यास मी उत्सुक आहे, असे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे. भारत दौर्‍यावर दाखल झालेले ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनीही जॉन्सन यांच्या भारत भेटीला दुजोरा दिला आहे.

निमंत्रण स्वीकारले

गेल्या वर्षभरात ब्रिटनचे चीनबरोबरील संबंध चिघळले असून ‘ब्रेक्झिट’मुळे युरोपिय देशांशी असणार्‍या सहकार्यावरही नकारात्मक परिणाम होणार आहेत. गेल्याच महिन्यात ब्रिटनमधील एका अभ्यासगटानेही जॉन्सन सरकारने चीनचा प्रभाव रोखण्यासाठी ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील भारतासारख्या लोकशाहीवादी देशाला मध्यवर्ती ठेऊन परराष्ट्र धोरण आखावे, असा सल्ला दिला होता. या पार्श्‍वभूमीवर, भारतासारख्या वेगाने विकसित होणार्‍या प्रभावशाली देशाबरोबर संबंध वाढविण्यासाठी ब्रिटनने पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे पंतप्रधान जॉन्सन यांनी स्वीकारलेल्या निमंत्रणावरून दिसून येते.

पंतप्रधान जॉन्सन यांनी मंगळवारी एक निवेदन प्रसिद्ध करून आपण पुढील वर्षी भारत दौर्‍यावर जात असल्याचे जाहीर केले. ‘पुढचे वर्ष ग्लोबल ब्रिटनच्या संकल्पनेची सुरुवात आहे. अशा वेळी भारतासारख्या देशाला भेट देण्यास आपण उत्सुक आहोत. मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ब्रिटन व भारताच्या संबंधांमध्ये मोठी झेप घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ’, असे जॉन्सन यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सामील होणारे बोरिस जॉन्सन हे गेल्या तीन दशकांमधील दुसरे ब्रिटीश पंतप्रधान ठरले आहेत. यापूर्वी १९९३ साली ब्रिटनचे तत्कालिन पंतप्रधान जॉन मेजर प्रजासत्ताक दिनासाठी उपस्थित राहिले होते.

जॉन्सन यांच्या दौर्‍याच्या तयारीसाठी ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब सध्या भारतात दाखल झाले आहेत. मंगळवारी त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेऊन तब्बल चार तास चर्चा केली. यात कोरोना साथीसह संरक्षण, व्यापार व इतर क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यावर बोलणी झाल्याची माहिती दोन्ही बाजूंकडून देण्यात आली आहे. यावेळी अफगाणिस्तान, इंडो-पॅसिफिक तसेच आखातातील स्थितीवरही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. दोन देशांमधील सहकार्य नव्या उंचीवर नेणे यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे, अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली.

पंतप्रधान जॉन्सन यांच्या भारत दौर्‍यात ‘मुक्त व्यापार करार’ व ‘इंडिया-युके डिफेन्स लॉजिस्टिक्स पॅक्ट’ या दोन करारांवर विशेष भर देण्याचे संकेत सूत्रांकडून देण्यात येत आहेत. त्याचवेळी डिजिटल तंत्रज्ञान, पर्यावरण व कोरोनाची लस हे मुद्देदेखील द्विपक्षीय चर्चेचा भाग असतील, असे सांगण्यात येत आहे.

leave a reply