कोरोनाव्हायरसचा तिसरा प्रकार हा जगासाठी ‘वेक अप कॉल’

- तज्ज्ञांचा इशारा

वॉशिंग्टन/लंडन – ब्रिटन व दक्षिण आफ्रिकेतील ‘कोरोनाव्हायरस स्ट्रेन’ नंतर ब्राझिलमध्येही नवा प्रकार विकसित झाल्याचे समोर आले असून ही घटना जगासाठी ‘वेक अप कॉल’ असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तर कोरोना साथीचे दुसरे वर्ष पहिल्या वर्षापेक्षा अधिक खडतर ठरु शकते, असे ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) बजावले आहे. गेल्या काही दिवसात अमेरिका व ब्रिटनसह ब्राझिलमध्येही कोरोनाने हाहाकार उडविण्यास सुरुवात केली असून, ही बाब तज्ज्ञांकडून देण्यात येणार्‍या इशार्‍याला दुजोरा देणारी ठरत आहे.

गेल्या सहा महिन्यात एकापाठोपाठ एक कोरोनाव्हायरसचे नवे प्रकार समोर येण्यास सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यात पहिल्यांदा ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा वेगाने फैलावणारा प्रकार आढळला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिका व आता ब्राझिलमधूनही नवा प्रकार समोर आला आहे. ब्रिटनमधील कोरोनाव्हायरसचा स्ट्रेन जगभरातील किमान ५० देशांमध्ये पसरला आहे. तर दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या प्रकाराचे रुग्ण २० देशांमध्ये आढळले आहेत. ब्राझिलमध्ये उदयाला आलेला कोरोनाव्हायरसचा नवा प्रकार जपान तसेच ब्रिटनमध्ये आढळला असून लॅटिन अमेरिकी देशांमध्येही त्याचा प्रसार झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतील आघाडीचे ‘व्हायरोलॉजिस्ट’ प्रोफेसर तुलिओ दे ऑलिव्हेरा यांनी, कोरोनाव्हायरसच्या नव्या प्रकाराचा उदय ‘वेक अप कॉल’ असल्याचा इशारा दिला. ‘आंतरराष्ट्रीय समुदायाने कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी खरोखरच गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. जर विषाणूचा प्रसार जास्त काळ होऊ दिला तर तो आपल्यावर मात करण्याची क्षमता सहजगत्या मिळवू शकतो. ही क्षमता कोरोनाव्हायरसचा प्रसार वाढविणारी असून शरीरात तयार होणार्‍या अँटिबॉडीज्ना चकवा देणारी ठरते’, या शब्दात प्रोफेसर तुलिओ दे ऑलिव्हेरा यांनी साथीची व्याप्ती वाढू शकते, असे बजावले आहे. ‘डब्ल्यूएचओ’मधील आघाडीच्या तज्ज्ञ डॉक्टर केर्खोव्ह यांनीही याला दुजोरा दिला.

अमेरिका, युरोप व लॅटिन अमेरिकेत कोरोनाव्हायरसच्या संसर्गाची तीव्रता वाढत असल्याचा इशारा डब्ल्यूएचओकडून देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात जगभरात सुमारे ५० लाख नव्या रुग्णांची नोंद झाल्याचे आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ९ कोटी ३२ लाखांवर गेली असून सुमारे २० लाख जण दगावले आहेत. अमेरिकेत गेले १० दिवस दररोज दोन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. बळींची संख्याही वेगाने वाढत असून सलग दोन दिवस चार हजारांहून अधिक बळी गेल्याचे सांगण्यात आले. साथीची ही तीव्रता कायम राहिली तर २० जानेवारीपर्यंत अमेरिकेतील बळींची संख्या चार लाखांवर जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

अमेरिकेपाठोपाठ ब्राझिलमध्येही कोरोनाच्या साथीने हाहाकार उडविला असून गेले दोन दिवस एक हजारांहून अधिक बळींची नोंद होत आहे. बळींची एकूण संख्या दोन लाख सात हजारांवर गेली आहे. ब्राझिलमधील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या ‘मनौस’मध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या रुग्णांची समख्या ३२ लाखांवर पोहोचली असून ८६ हजारांहून अधिक जण दगावले आहेत. साथीचे उगमस्थान असणार्‍या चीनमध्येही कोरोनाची व्याप्ती वाढण्यास सुरुवात झाली असून चार शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला आहे. पाच महिन्यानंतर पहिल्यांदाच चीनमध्ये एका दिवसात ११५ रुग्णांची नोंद झाली आहे.

leave a reply