देशाच्या आत्मसन्मानाला धक्का देऊ पाहणार्‍यांना जबरदस्त प्रत्युत्तर मिळेल

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचा चीनला नवा इशारा

बंगळुरू – ‘लडाखच्या एलएसीवर चीनबरोबर झालेल्या संघर्षात भारतीय सैनिकांनी गाजविलेल्या पराक्रम आणि संयमाची माहिती ज्या भारतीयाला मिळेल, त्याचे मस्तक अभिमानाने उंचावल्याखेरीज राहणार नाही. जगातील कितीही मोठ्या शक्तीने भारताच्या सन्मानला धक्का देण्याचा प्रयत्न केलाच, तर त्याला भारतीय सैनिकांकडून त्याला जबरदस्त प्रत्युत्तर दिले जाईल’, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी बजावले आहे.

बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात निवृत्त सैनिकांना संबोधित करताना संरक्षणमंत्री बोलत होते. पाकिस्तानबरोबरील एलओसी व चीनबरोबरील एलएसीवर सुरू असलेल्या घडामोडींचा दाखला यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिला. पाकिस्तान एलओसीवर वारंवार संघर्षबंदीचे उल्लंघन करून गोळबार करीत आहे. त्याला भारतीय सैनिकांकडून सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले. त्याचवेळी लडाखच्या एलएसीवर भारतीय सैनिकांनी चीनच्या विरोधात केलेल्या पराक्रमाचा यावेळी संरक्षणमंत्री गौरवपूर्ण उल्लेख केला. ‘लडाखच्या एलएसीवर भारतीय सैनिकांनी गाजविलेला पराक्रम व संयम यांची देशवासियांना किती प्रमाणात माहिती आहे, ते ठाऊक नाही. पण ज्या कुणाला याची माहिती मिळालेली आहे, त्या प्रत्येक भारतीयाचे मस्तक अभिमानाने उंचावल्यावाचून राहणार नाही’, असे गौरवोद्गगार राजनाथ सिंग यांनी काढले.

‘भारताला शेजारी देशांबरोबर युद्ध अपेक्षित नाही, तर भारताला सर्वच देशांबरोबर मैत्री हवी आहे. दुसर्‍या देशाच्या सन्मानला भारत कधीही धक्का देणार नाही. पण भारताच्या सन्मानाला धक्का देण्याचा प्रयत्न जगातील कितीही मोठ्या शक्तीने केला, तर भारतीय सैनिकांकडून त्याला जबरदस्त प्रत्युत्तर दिले जाईल’, असे संरक्षणमंत्र्यांनी बजावले. गेल्या काही आठवड्यांपासून संरक्षणमंत्री सातत्याने असे इशारे देत असून थेट चीनचा उल्लेख करीत आहे. त्याचवेळी देशाचे संरक्षणदलप्रमुख, लष्करप्रमुख व वायुसेनाप्रमुख सातत्याने लडाखच्या एलएसीचा दौरा करून इथल्या संरक्षणसिद्धतेचा आढावा घेत आहेत. हा योगायोग नसून याचा चीनच्या हालचालींशी संबंध असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

लडाखच्या गलवान व्हॅलीतील संघर्षात कर्नल संतोष बाबू यांच्यासह भारताचे २० जवान शहीद झाले होते. पण या संघर्षात चीनचे फार मोठे नुकसान झाले असून ठार झालेल्या आपल्या जवानांची संख्या चीनने उघड केलेली नाही. या संघर्षात भारतीय सैन्यापेक्षा आपली अधिक हानी झाली, ही बाब दडविण्याचा प्रयत्न चीनकडून केला जात आहे. त्यानंतरच्या काळातही भारतीय सैनिकांनी चीनच्या लष्कराचे दडपण झुगारून या क्षेत्रात पायाभूत सुविधांचे विकासप्रकल्प राबविले होते. यामुळे भारतीय लष्कराची वाहतूक व तैनाती अधिक सुलभ बनली आहे. इतकेच नाही तर गेल्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस भारतीय लष्कराने लडाखच्या पँगाँग सरोवर क्षेत्राच्या दक्षिणेकडील महत्त्वाच्या टेकड्यांचा ताबा मिळविला होता. या टेकड्यांवर चीनने संरक्षणसाहित्य तैनात करून आपला दावा भक्कम करण्याची तयारी केली होती. त्यामुळे या टेकड्यांवरील भारतीय सैन्याचा ताबा ही चीनसाठी धक्कादायक बाब ठरली होती.

या टेकड्या ताब्यात घेण्यासाठी चीनच्या लष्कराने दोन वेळा चढाई करण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण भारतीय सैनिकांनी चीनच्या जवानांना इथून पिटाळून लावले. याची गंभीर दखल घेऊन चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी चिनी लष्कराचे संबंधित अधिकार्‍यांची खरडपट्टी काढल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसेच यानंतरच्या काळात चिनी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी वेगळे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. लडाखच्या एलएसीवर कडक हिवाळ्यात केलेली हजारो जवानांची तैनाती देखील चीनच्या अप्रतिष्ठेचा विषय बनला होता. इथे चिनी जवान थंडीत कुडकुडत असल्याची व त्यामुळे आजारी पडत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

लडाखमधील या संघर्षात भारताची सरशी झाली असून चीनसाठी हा इशाराघंटा असल्याचे परखड मत पाश्‍चिमात्य विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. यामुळेच अस्वस्थ झालेला चीन लडाखच्या एलएसीवर भारताला धक्का देऊन आपली प्रतिष्ठा परत मिळविण्यासाठी धडपडत आहे. यासाठी चीनकडून केले जाणारे प्रयत्न स्पष्टपणे दिसू लागले आहेत. त्याचवेळी चीनने इथून दहा हजार जवान मागे घेतल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. अशा बातम्या सोडून भारताला बेसावध ठेवून एखादी कारवाई करण्याचे कारस्थान चीनने आखले असावे, अशी दाट शक्यता समोर येत आहे. मात्र भारतीय सैन्याने केवळ लडाखच नाही तर संपूर्ण एलएसीवरच सतर्कता वाढविली आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी याची घोषणा केली होती.

या पार्श्‍वभूमीवर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून चीनला सातत्याने इशारे दिले जात आहेत. भारताच्या सन्मानाला धक्का देण्याचा प्रयत्न करणार्‍या चीनलाच याचे हादरे बसतील, हा संदेश देशाचे संरक्षणमंत्री सातत्याने देत आहेत.

leave a reply