पाकिस्तानमध्ये अडकलेल्या हजारो अफगाणींची मायदेशी धाव

इस्लामाबाद – कोरोनाव्हायरसमुळे पाकिस्तानमध्ये अडकून पडलेल्या हजारो अफगाणींनी मायदेशी धाव घेतली. पाकिस्तानमध्ये जवळपास दहा हजार अफगाणी नागरिक अडकले होते. पण पाकिस्तानमध्ये कोरोनाव्हायरसचा फैलाव वाढल्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानलगतची सीमा बंद केली होती. पाकिस्तानने ही सीमा खुली केल्यानंतर जीवाच्या भितीने अफगाणी जनता मायदेशी धाव घेत असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानने सीमा खुली करुन अफगाणी जनतेची सुटका करावी, अशी मागणी अफगाणिस्तानच्या यंत्रणेने पाकिस्तानकडे केली होती. त्यानुसार शनिवारी पाकिस्तानने चार दिवसांसाठी अफगाणिस्तानलगतची सीमा खुली करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी अगदी शिस्तबध्द पद्धतीने अफगाणी जनतेला जाऊ देण्यात आले. पण मंगळवारी मात्र इथल्या व्यवस्थेचे तीनतेरा वाजले. नियम मोडून आणि सोशल डिस्टसिंग न पाळता हजारोंच्या संख्येने अफगाणी जनतेने पळ काढला. याचे व्हिडीओ आणि फोटोग्राफ्स माध्यमांमध्ये प्रसिध्द झाले आहेत. त्यानंतर पाकिस्तानवर टीका होत आहे. अफगाणी यंत्रणेनेही पाकिस्तानवर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवला. या एका चुकीमुळे अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाव्हायरसचा फैलाव होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पण पाकिस्तानी यंत्रणेने हे आरोप फेटाळले आहेत.

पाकिस्ताननमध्ये वेगाने कोरोनाव्हायरसचा फैलाव होत आहे. आतापर्यंत पाकिस्तानमध्ये चार हजारहून अधिक जणांना या साथीची लागण झाली आहे. एप्रिल अखेरपर्यंत ही संख्या ५० हजारांवर जाईल, अशी भिती व्यक्त केली जाते. त्याच्याही पलिकडे जाऊन काही पाकिस्तानी पत्रकारांनी याक्षणी पाकिस्तानमध्ये लाखो जणांना कोरोनाव्हायरसची लागण झालेली असू शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे अफगाणी जनतेच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे संधी मिळताच अफगाणींनी मायदेशी धाव घेतली.

दरम्यान, अफगाणिस्तानची सीमा इराणला मोठ्या प्रमाणावर भिडलेली असल्यामुळे या देशात कोरोनाव्हायरसचा फैलाव होण्याची भिती आहे. अफगाणिस्तानच्या हेरात आणि जलालाबादला याचा सर्वात मोठा धोका आहे. त्यात या प्रांतात आरोग्यविषयक सोयी सुविधा नाहीत. म्हणून भारताने या प्रातांतले आपले दूतावास तात्पुरते बंद केले आहेत. या दूतावासातले कर्मचारी आणि आयटीबीपीच्या सुरक्षारक्षकांना भारताने एअरलिफ्ट करुन मायदेशी आणले.

leave a reply