तैवानवरून अमेरिका-चीन युद्ध भडकण्याचा धोका वाढला

- विश्‍लेषक व अधिकार्‍यांचा इशारा

अमेरिका-चीनवॉशिंग्टन/बीजिंग – चीनकडून तैवान क्षेत्रात सुरू असलेल्या आक्रमक कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर या क्षेत्रात अमेरिका-चीन युद्धाचा भडका उडण्याचा धोका वाढल्याचा इशारा विश्‍लेषक तसेच अधिकार्‍यांकडून देण्यात येत आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच चीनच्या सुमारे दीडशे विमानांनी तैवानच्या ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’मध्ये (एडीआयझेड) घुसखोरी केली होती. त्यापाठोपाठ चीनने आपल्या सागरी क्षेत्रात तैवानवरील आक्रमणाचा सराव केल्याचेही समोर आले आहे. याच कालावधीत अमेरिकेने आपल्या सहकारी देशांसह नौदल सराव केल्याचेही वृत्त देण्यात आले. अशा घटना वाढत असून त्यातून घडलेली एखादी दुर्घटना युद्धाला तोंड फोडेल, याकडे विश्‍लेषकांनी लक्ष वेधले आहे.

चीनच्या आक्रमक कारवाया तैवान क्षेत्रातील जैसे थे स्थिती सातत्याने बदलण्याचा प्रयत्न आहे. सलामी स्लायसिंगचे धोरण यामागे आहे. तैवान याबाबत काही करु शकत नाही, याची चीनला कल्पना आहे. त्यामुळेच या क्षेत्रात एखादी दुर्घटना घडण्याचा धोका जास्त आहे’, या शब्दात सिंगापूरमधील विश्‍लेषक हु तिआंग बून यांनी युद्धाच्या शक्यतेकडे लक्ष वेधले. तर ‘आयआयएसएस’च्या हेन्री बॉईड यांनी अमेरिकेच्या वाढत्या सज्जतेकडे लक्ष वेधले आहे.

‘तैवानचा मुद्दा हा आता अमेरिकेसाठी चीनविरोधातील सत्तासंघर्षाचा भाग झाला आहे. चीनच्या समोर ठामपणे उभे राहणे, हा अमेरिकेला प्रोत्साहन देणारा घटक ठरतो आहे. जर चीनविरोधात खडे ठाकले नाहीत तर अमेरिकेत हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी केलेला द्रोह ठरेल, अशी भावना जोर पकडते आहे’, असा दावा बॉईड यांनी केला. अमेरिका-चीनयावेळी त्यांनी चीनच्या वाढत्या संरक्षणसज्जतेचाही उल्लेख केला. आपल्या संरक्षणसामर्थ्याच्या बळावर अमेरिकेला तैवान क्षेत्र व नजिकच्या भागात येण्यापासून रोखणे हा चीनच्या तैवान धोरणातील महत्त्वाचा टप्पा आहे, असे ब्रिटीश विश्‍लेषकांनी सांगितले.

गेल्या काही दिवसात अमेरिकेकडून चीनच्या मुद्यावरून अधिक आक्रमक विधाने करण्यात येत असल्याचेही समोर येत आहे. अमेरिकेचे ‘नेव्ही सेक्रेटरी’ कार्लोस डेल तोरो यांनी, चीनचा उल्लेख अमेरिकेइतकीच क्षमता असणारा सामरिक स्पर्धक असा केला. तर परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी, अमेरिका-तैवान मुद्यावर बोलताना अमेरिकेचा तैवानला असलेला पाठिंबा ‘रॉक सॉलिड’ असल्याची ग्वाही दिली.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एच. आर. मॅक्मास्टर यांनी, तैवानच्या सुरक्षेसाठी पुढील १२ महिने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बजावले होते. तर तैवानच्या संरक्षणमंत्र्यांनी, चीनच्या संरक्षणदलांकडे आजही तैवानवर हल्ला चढविण्याची क्षमता आहे, असा इशारा दिला होता. गेल्याच आठवड्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुन्हा तैवानच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित करून ते महत्त्वाचे ध्येय असल्याचा दावा केला होता.

leave a reply