अमेरिकेत तिबेटींची चीनविरोधात निदर्शने

न्यूयॉर्क – दोन आठवड्यांपूर्वी लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील संघर्षात ‘स्पेशल फ्रंटिअर्स फोर्स’चे (एसएफएफ) कमांडो निमा तेंझिन यांनी दिलेल्या बलिदानाने जगभरातील तिबेटी जनतेच्या चीनविरोधी आंदोलनाला नवे बळ मिळत आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात तिबेटी जनतेने केलेल्या निदर्शनात चीनविरोधात घोषणा दिल्या. त्याचबरोबर चीनविरोधात लढणार्‍या ‘एसएफएफ’ सैनिकांच्या समर्थनार्थ घोषणा देऊन ‘जय तिबेट देश’चा नारा दिला. यावेळी तिबेटी निदर्शकांनी आपण या संघर्षात सदैव भारतासोबत असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेत तिबेटींची चीनविरोधात निदर्शनेशहीद कमांडो निमा तेंझिन यांनी दिलेल्या या बलिदानाच्या समर्थनार्थ आणि चीनने भारताच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ सुरू केलेल्या कारवाईच्या विरोधात तिबेटींनी अमेरिकेत नुकतीच निदर्शने केली. न्यूयॉर्क शहरातील ‘लिटील इंडिया’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जॅकसन हाईट्सच्या भागात तिबेटींनी या निदर्शनाचे आयोजन केले होते. यावेळी तिबेटी निदर्शकांनी चीनविरोधात घोषणा दिल्या. तसेच भारतीय लष्कर तसेच ‘एसएफएफ’च्या कमांडो पथकासाठी प्रार्थना केली. या निदर्शनात ‘एसएफएफ’चे माजी कमांडोज् देखील सहभागी झाले होते. यावेळी एका तिबेटी सैनिकाने परवानगी मिळाल्यास पुन्हा सीमेवर जाऊन लढण्याचा इरादा व्यक्त केला.

‘चीनविरोधातील या संघर्षात तिबेटी जनता ही नेहमीच भारतासोबत आहे’, असे सांगून हा संघर्ष भारत-चीन सीमेजवळ नाही तर भारत-तिबेट सीमेजवळ सुरू असल्याचे या माजी सैनिकाने सष्ट केले. यावेळी तिबेटच्या स्वातंत्र्याच्या आणि ‘जय तिबेट देश’च्या घोषणा देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, कॅनडा, ब्रिटनसह युरोपिय देश तसेच ऑस्ट्रेलिया, जपान या देशांमध्ये अनिवासी भारतीय चीनच्या विरोधात निदर्शने करीत असून यामध्ये तिबेटी जनतेचा सहभाग लक्षणीयरित्या वाढत चालला आहे. त्याचबरोबर ‘जय तिबेट देश’चा नाराही अधिकाधिक जोर पकडू लागला आहे.

२९-३० ऑगस्टच्या रात्री भारतीय लष्कराच्या ‘एसएफएफ’च्या पथकाने लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील ‘ब्लॅक टॉप’ आणि ‘हेल्मेट टॉप’वर ताबा मिळविण्याचा पराक्रम गाजविला होता. यावेळी ‘एसएफएफ’चे कमांडो निमा तेंझिन भुसूरुंग स्फोटात शहीद झाले होते. शहीद कमांडो तेंझिन यांना अखेरचा निरोप देताना तिबेटी जनतेने चीनच्या विरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला होता. त्याचे पडसाद आता जगभरात उमटू लागले आहेत.

leave a reply