उत्तर कोरियावर ‘ऍक्शन’ घेण्याची वेळ आली आहे

- दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-ईन

सेऊल – ‘आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम राबविणार्‍या उत्तर कोरियावर ऍक्शन घेण्याची वेळ आली आहे’, असे आवाहन दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-ईन यांनी केले. राष्ट्राध्यक्ष मून जे-ईन पुढच्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेणार आहेत. या भेटीच्या पार्श्‍वभूमीवर, उत्तर कोरियातील किम जॉंग-उन यांची राजवट क्षेपणास्त्र सामर्थ्याचे प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर, दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेला आवाहन केल्याचे दिसते.

उत्तर कोरियावर ‘ऍक्शन’ घेण्याची वेळ आली आहे -दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-ईनअमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाबाबत कणखर धोरण स्वीकारले होते. ट्रम्प यांनी उत्तर कोरियन हुकूमशहांची भेट घेऊन अणुकार्यक्रमावर वाटाघाटी करण्यासाठी चर्चा केली होती. यामुळे किमान दीड वर्षांसाठी उत्तर कोरियाने आण्विक आणि क्षेपणास्त्र चाचण्या रोखल्या होत्या.

तरीही ट्रम्प यांच्या या भूमिकेवर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-ईन नाखूश होते व गेल्या महिन्यात त्यांनी त्यावरील नाराजी व्यक्तही केली होती. पण आता ट्रम्प यांच्या जागी आलेले राष्ट्राध्यक्ष बायडेन उत्तर कोरियाच्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारतील, अशी अपेक्षा दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली होती.

पण बायडेन प्रशासनाने आपल्या परराष्ट्र धोरणात उत्तर कोरियाला फारसे महत्त्व दिलेले नाही. गेल्या आठवड्यात अमेरिकन कॉंग्रेसमध्ये बोलतानाही बायडेन यांनी उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमाचा उल्लेख केला खरा, पण त्याला विशेष महत्त्व दिले नाही. दक्षिण कोरियाचा अपेक्षाभंग झाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत. त्यातच उत्तर कोरियाने आपल्या क्षेपणास्त्रांच्या हालचाली वाढविल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये होणार्‍या बैठकीच्या आधी उत्तर कोरिया क्षेपणास्त्रांद्वारे शक्तीप्रदर्शन करून इशारा देण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती या बातम्यांमधून देण्यात आली आहे.

उत्तर कोरियावर ‘ऍक्शन’ घेण्याची वेळ आली आहे -दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-ईनया पार्श्‍वभूमीवर, दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्ष मून जे-ईन यांनी बायडेन प्रशासनाला आवाहन केले आहे. ‘आत्ता चर्चा करीत राहण्यासाठी अवधी उरलेला नाही. कोरियन क्षेत्रात शांती प्रस्थापित करायची असेल आणि त्यासाठी उत्तर कोरियावर ऍक्शन घ्यायची असेल, तर ती वेळ आलेली आहे’, असे राष्ट्राध्यक्ष मून जे-ईन यांनी ठासून सांगितले.

दरम्यान, २१ मे रोजी राष्ट्राध्यक्ष मून जे-ईन अमेरिकेचा दौरा करणार आहेत. त्याआधी मंगळवारी अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांची टोकिओ येथे विशेष बैठक संपन्न होत आहे. उत्तर कोरियाबाबत बायडेन प्रशासनाचे धोरण यावर ही बैठक आयोजित करण्यात येत असल्याचा दावा केला जातो.

याच्या आधी उत्तर कोरियाने थेट अमेरिकेवरच अणुहल्ला चढविण्याची धमकी दिली होती. अमेरिकेत कुणी याकडे गंभीरपणे पाहिलेले नाही. मात्र माथेफिरू देश अशी जगभरात ख्याती असलेल्या उत्तर कोरियाकडे कुणालाही दुर्लक्ष करता येणार नाही, असे संकेत दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष बजावत आहेत. त्याचवेळी अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांची बैठकही कोरियन क्षेत्रातील परिस्थिती संवेदनशील बनल्याचा इशारा देत आहे.

leave a reply