तुर्कीची अफगाणिस्तानातील सैन्यतैनाती गंभीर चूक ठरेल – तालिबानचा तुर्कीला इशारा

दोहा/इस्लामाबाद – ‘नाटोच्या सहकारी देशांच्या माघारीनंतरही अफगाणिस्तानात सैन्य तैनात ठेवणे ही तुर्कीसाठी गंभीर चूक ठरेल. ते तुर्कीच्या भल्याचे नसेल’, असा सज्जड इशारा तालिबानने दिला आहे. त्याचबरोबर नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कीलाही अफगाणिस्तानातील घुसखोर ठरवून कारवाई केली जाईल, अशी धमकी तालिबानच्या नेत्यांनी दिली. काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेसाठी आपले जवान तैनात ठेवण्याची मागणी तुर्कीने नाटोकडे केली होती. त्याला अमेरिकेने या मागणीला पाठिंबा दिला आहे. यानंतर भडकलेल्या तालिबानने तुर्कीला पुन्हा एकदा या विरोधात इशारा दिल्याचे दिसत आहे.

तुर्कीला इशाराएका इस्लामधर्मिय देशाने परक्या घुसखोरांच्या बाजूने उभे राहून दुसर्‍या एका इस्लामी देशाशी शत्रूत्त्व पत्करणे शोभनीय बाब ठरत नाही, असे तालिबानने तुर्कीला बजावले. याआधीही तालिबानने तुर्कीला असाच इशारा दिला होता. अमेरिका व नाटोच्या सैन्यमाघारीनंतरही अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेसाठी आपले सैन्य तैनात ठेवण्याचा प्रस्ताव तुर्कीने मांडला होता. त्याला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे. पण त्यावर तालिबानची प्रतिक्रिया आली व नाटोचा सदस्यदेश असलेल्या तुर्कीला अफगाणिस्तानात सैन्य तैनात ठेवता येणार नाही, असे तालिबानने बजावले होते.

तुर्कीला इशाराकाबुल विमानतळाच्या सुरक्षेसाठी जवान तैनात करण्याच्या मोबदल्यात तुर्की अमेरिकेकडून अर्थसहाय्य उकळण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला जातो. तुर्कीची अर्थव्यवस्था घसरणीला लागलेली आहे. तुर्कीला अमेरिकेच्या सहाय्याची फार मोठी आवश्यकता भासत आहे. यासाठी तुर्कीने तालिबानवर हल्ल्यासाठी अमेरिकेला लष्करी तळ देऊ केल्याची चर्चा आहे. मात्र याच्या मोबदल्यात अमेरिकेने आपल्यावरील निर्बंध मागे घ्यावे, अशी तुर्कीची अट आहे. पण तालिबान तुर्कीच्या या हालचालींकडे अत्यंत बारकाईने पाहत आहे.

कतारची राजधानी दोहा येथे तालिबानचे राजनैतिक कार्यालयातील प्रवक्ते मुहम्मद नईम आणि अफगाणिस्तानातील तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद यांनी तुर्कीला सज्जड इशारा दिला. ‘अफगाणिस्तानात घुसखोरी करणारे पाश्‍चिमात्य देश आणि त्यांच्या सहकारी देशांची या देशातील उपस्थिती कदापि सहन करणार नाही, हे तालिबानने आधीच स्पष्ट केले होते’, असे सांगून नईमने तुर्कीला गेल्या आठवड्यातील इशार्‍याची आठवण करून दिली. त्याचबरोबर ही तैनाती तुर्कीसाठी गंभीर चूक ठरेल, असे नईमने बजावले आहे.

तुर्कीला इशारा‘तुर्की हा जरी इस्लामी देश असला तरी अफगाणिस्तानात घुसखोरी करणार्‍या पाश्‍चिमात्य लष्कराबरोबरच्या संघर्षात तुर्कीही सहभागी झाला होता. त्यामुळे विमानतळाच्या सुरक्षेच्या बहाण्याने अफगाणिस्तानातील घुसखोरांची तैनाती खपवून घेतली जाणार नाही, मग अगदी ते तुर्कीचे जवान असले तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल’, अशी धमकी मुजाहिद याने दिली.

दरम्यान, अफगाणिस्तानातील सहकार्यावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी तुर्कीत दाखल झाले आहेत. अमेरिका व मित्रदेशांच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानातील भूमिकेवर तुर्कीच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.

तुर्की आणि पाकिस्तानला तालिबानच्या विरोधात वापरण्यासाठी अमेरिकेने सापळा लावला आहे. या दोन्ही देशांनी अमेरिकेच्या सापळ्यात स्वतःला अडकवून घेऊ नये, असा इशारा पाकिस्तानातील कट्टरपंथिय विश्‍लेषक देत आहेत.

leave a reply