रशियाच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करून तुर्कीने युक्रेनला ‘आर्म्ड ड्रोन’ पुरविले

‘आर्म्ड ड्रोन’अंकारा/किव्ह – रशियाने वारंवार दिलेल्या इशार्‍यांनंतरही तुर्कीने युक्रेनबरोबरील संरक्षणसहकार्य अधिक बळकट करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच तुर्कीने युक्रेनच्या नौदलाला पहिले ‘बेरक्तर टीबी2 कॉम्बॅट ड्रोन’ सुपूर्द केल्याची माहिती समोर आली आहे. त्यापाठोपाठ दोन देशांमध्ये विनाशिका, इंजिन्स तसेच गॅस टर्बाइन्ससाठी करार तसेच बोलणी झाल्याचे वृत्तही समोर आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून तुर्कीचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रभाव वाढविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांची धडपड सुरू आहे. त्या अनुषंगाने राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी अनेक आक्रमक पावले उचलली असून युक्रेनबरोबरील लष्करी सहकार्य हादेखील त्याचाच भाग मानला जातो. एका बाजूला सिरिया व लिबियातील संघर्ष तसेच संरक्षणक्षेत्रात रशियाबरोबरील सहकार्य भक्कम करीत असतानाच, तुर्कीने युक्रेनबरोबर संबंध वाढविण्याच्याही हालचाली सुरू केल्या होत्या.

2019 साली तुर्कीने युक्रेनबरोबर ड्रोन्ससाठी करार केला होता. सुमारे सात कोटी डॉलर्सच्या या करारानुसार, तुर्की युक्रेनला सहा ‘बेरक्तर टीबी2 कॉम्बॅट ड्रोन्स’ व शस्त्रे पुरविणार आहे. त्यातील पहिले ड्रोन युक्रेनच्या नौदलाला देण्यात आल्याची माहिती युक्रेनच्या संरक्षण विभागाने दिली आहे. उर्वरित ड्रोन्स येत्या वर्षभरात युक्रेनला मिळतील, असे संकेत युक्रेनच्या नौदलाने दिले आहेत. युक्रेनचे नौदल सदर ड्रोन्स ‘ब्लॅक सी’ व ‘सी ऑफ अ‍ॅझोव्ह’मध्ये तैनात करणार असल्याचेही सांगण्यात येते.

‘आर्म्ड ड्रोन’ड्रोन्सच्या करारापाठोपाठ तुर्की व युक्रेनमध्ये विनाशिका, हेलिकॉप्टर तसेच ड्रोन्ससाठी इंजिन्स व युद्धनौकांसाठी गॅस टर्बाइन्स यासाठीही बोलणी झाल्याचे सांगण्यात येते. तुर्कीतील युक्रेनच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेन तुर्कीकडून दोन ‘अ‍ॅडा क्लास’ विनाशिका खरेदी करणार आहे. हा संयुक्त प्रकल्प असून पहिली विनाशिका 2023 साली युक्रेनला मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

युक्रेनकडून तुर्कीला ‘अटॅक हेलिकॉप्टर’ तसेच नव्या ड्रोनसाठी इंजिन्स पुरविण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे. तुर्कीच्या युद्धनौकेसाठी गॅस टर्बाइन पुरविण्याची तयारीही युक्रेनने दर्शविली आहे. युक्रेन व तुर्कीमधील या वाढत्या संरक्षण सहकार्याला अमेरिकेतील बायडेन प्रशासनाचे समर्थन असल्याचे विश्‍लेषकांकडून सांगण्यात येत आहे. रशियाला रोखण्याच्या धोरणाचा भाग म्हणून हे समर्थन असल्याचे मानले जाते. तुर्की व युक्रेनमधील वाढत्या सहकार्यावर रशियाने यापूर्वी सातत्याने इशारे दिले आहेत. ‘आमच्या तुर्कीतील सहकार्‍यांनी युक्रेनमधील परिस्थितीचा काळजीपूर्वक अभ्यास करावा आणि युक्रेनला लष्करी बळ देणे थांबवावे’, असा खरमरीत इशारा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्याचे समोर आले होते. युक्रेनबरोबर संरक्षण सहकार्य वाढविणार्‍या तुर्कीने क्रिमिआवरील रशियाचा दावाही नाकारला होता. त्यामुळे रशिया अधिकच नाराज असल्याचे मानले जाते.

leave a reply