सिरियातील तुर्कीच्या कारवाईत ११ कुर्द ठार

- तुर्कीने सिरियाचा अवैध ताबा घेतल्याचा आरोप

११ कुर्ददमास्कस/वॉशिंग्टन – पुढच्या आठवड्यात रशिया, तुर्की आणि इराणमध्ये सिरियाबाबत त्रिस्तरीय बैठक पार पडणार आहे. पण त्याआधी तुर्कीने सिरियात अतिरिक्त सैन्यतैनाती करून कुर्दबहुल भागावर हल्ले चढविले. यामध्ये ११ कुर्द बंडखोरांना ठार केल्याचा दावा तुर्कीने केला. तर तुर्कीच्या सैन्यतैनातीवर कडाडून आक्षेप घेऊन तुर्कीने सिरियातील अवैध ताबा सोडून माघार घ्यावी, असा इशारा सिरियाने दिला आहे. रशियाने सिरियातील तुर्कीसंलग्न दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याच्या बातम्या येत आहेत.

काही आठवड्यांपूर्वी राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्साद यांच्या पक्षाने सिरियातील निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळविला. त्यानंतर सिरियाची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसविण्यासाठी रशिया व इराणने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी पुढच्या आठवड्यात रशियाच्या पुढाकाराने त्रिस्तरीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीत रशिया, इराण व तुर्कीचा समावेश असेल. यावेळी सिरियातील संघर्षबंदी, निर्वासितांना पुन्हा सिरियात वसविणे यासारख्या प्रमुख मुद्यांवर चर्चा होईल.

या बैठकीत रशिया सिरियाबाबत अधिक आक्रमक भूमिका घेऊन अस्सादविरोधी गटांवर कारवाई करण्याचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. अस्साद राजवटीचे समर्थक असलेल्या इराणकडून रशियाच्या या प्रस्तावाला पाठिंबा मिळेल. पण रशियाच्या या कारवाईमुळे सिरियातील विस्थापितांचे लोंढे अधिक मोठ्या संख्येने आपल्या देशात धडकतील, अशी भीती तुर्कीला सतावित आहे.

हे कारण पुढे करून तुर्कीने सिरियात नव्याने सैन्यतैनाती सुरू केली. तसेच उत्तर सिरियातील कुर्द संघटनांकडून आपल्याविरोधात हालचाली सुरू असल्याचे आरोप करून तुर्कीने त्यांच्यावर लष्करी कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी केलेल्या कारवाईत कुर्दिश पिपल्स प्रोटेक्शन युनिट्सचे (वायपीजी) ११ बंडखोर ठार केल्याची माहिती ११ कुर्दतुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. कुर्द बंडखोर आपल्या सीमेत घुसखोरीच्या तयारीत असताना ही कारवाई केल्याचे तुर्कीने म्हटले आहे. तुर्कीने वायपीजी तसेच पीकेके या कुर्दांच्या संघटनांना दहशतवादी घोषित केले आहे.

मात्र तुर्कीचा हा खुलासा सिरियाला मान्य नाही. आपल्या देशाच्या उत्तरेकडील भागात सैन्य घुसवून अवैध ताबा घेतल्याचा आरोप सिरियाचे परराष्ट्रमंत्री फैझल मकदाद यांनी केला. तुर्कीच्या घुसखोरीमुळे इदलिबमध्ये संघर्ष भडकल्याचा ठपका मकदाद यांनी ठेवला. तुर्कीने ताबडतोब सिरियातून माघार?घ्यावी, अशी मागणी सिरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने या आघाडीवर सिरियाला प्रयत्नांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन परराष्ट्रमंत्री मकदाद यांनी रशियन वृत्तसंस्थेशी बोलताना केले.

दरम्यान, रशियाने इदलिब भागात लष्करी व हवाई हल्ले चढविल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या आठवड्यात सिरियन राष्ट्राध्यक्ष अस्साद यांनी रशियाचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली होती. यानंतर रशियाने इदलिबमधील तुर्कीसंलग्न बंडखोरांवर हल्ले वाढविल्याचे समोर येत आहे. रशियाच्या या कारवाईविरोधात तुर्कीने सिरियाच्या उत्तरेकडील भागात अतिरिक्त सैन्यतैनाती केल्याचे दिसत आहे.

leave a reply