चीनच्या १२ विमानांची तैवानच्या हद्दीत घुसखोरी

- तैवानकडून ‘मिसाईल सिस्टिम’ तैनात

‘मिसाईल सिस्टिम’तैपेई/बीजिंग – गेल्या दोन दिवसात चीनच्या १२ विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. चीनच्या या घुसखोरीविरोधात तैवानने ‘मिसाईल सिस्टिम’ तैनात केल्याचे समोर आले आहे. चीनच्या लढाऊ विमानांनी आता थेट तैवानच्या हद्दीत गस्त घालावी, असा आक्रमक सल्ला चीनच्या सरकारी मुखपत्राने नुकताच दिला होता. या पार्श्‍वभूमीवर ही वाढती घुसखोरी लक्ष वेधून घेणारी ठरते.

सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून चीनकडून तैवानविरोधातील ‘ग्रे झोन वॉरफेअर’ची तीव्रता अधिक वाढल्याचे समोर येत आहे. गेल्या १६ दिवसांमध्ये चीनच्या विमानांनी १५ वेळा घुसखोरी केली असून ३ सप्टेंबरपासून रोज चीनची विमाने तैवानच्या हद्दीत घुसत असल्याचे समोर आले आहे. बुधवार व गुरुवार या दोन दिवसांमध्ये चीनच्या १२ विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली आहे. बुधवारी नऊ तर गुरुवारी तीन विमानांनी घुसखोरी केल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.

बुधवारी घुसखोरी केलेल्या विमानांमध्ये ‘शेनयांग जे-१६ फायटर जेट्स’(६), ‘शांक्सी वाय-८ अँटी सबमरिन एअरक्राफ्ट’, ‘शांक्सी वाय-८ रिकनेसन्स एअरक्राफ्ट’ व ‘केजे-५०० एअरबोन अर्ली वॉर्निंग ऍण्ड कंट्रोल एअरक्राफ्ट’चा समावेश होता. तर गुरुवारी घुसखोरी करणार्‍या चिनी विमानांमध्ये दोन ‘शेनयांग जे-१६ फायटर जेट्स’सह एका ‘शांक्सी वाय-८ इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर एअरक्राफ्ट’चा समावेश आहे. चीनच्या या घुसखोरीला रोखण्यासाठी रेडिओ वॉर्निंग देण्याबरोबरच ‘मिसाईल सिस्टिम’ तैनात केल्याची माहिती तैवानने दिली.

तैवानच्या संरक्षणदलांकडून व्यापक युद्धसराव सुरू असतानाच चीनच्या विमानांनी इतक्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी करणे लक्ष वेधून घेणारे ठरते. चीनच्या सरकारी मुखपत्राने काही दिवसांपूर्वीच तैवानच्या आक्रमक धोरणांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता थेट तैवानच्या हद्दीत चिनी लढाफ विमाने धाडायला हवीत, असे बजावले होते. चीनने ‘मिसाईल सिस्टिम’तैवानी जनतेप्रती सदिच्छा म्हणून अशा प्रकारची कृती केली नव्हती, पण आता त्यांना चीनची सार्वभौमता दाखवून देणे गरजेचे आहे, असा इशारा ‘ग्लोबल टाईम्स’ने दिला होता.

तैवानच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय समुदाय अधिक आक्रमक भूमिका घेत असल्याचे चीनची राजवट बिथरल्याचे दिसत आहे. त्यामुळे ‘ग्रे झोन वॉरफेअर’चा वापर करून तैवानवरील दडपण वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. २०१० नंतरच्या दशकात चीनने ‘ग्रे झोन वॉरफेअर’चा वापर सुरू केला असून, विमानांबरोबरच शेकडो सशस्त्र मच्छिमारी बोटींचा समावेश असलेल्या ‘नेव्हल मिलिशिआ’चाही वापर करण्यात येत आहे. तैवानच्या संरक्षणदलांना त्रास देऊन कायम दडपणाखाली ठेवणे व कमकुवत करणे हा त्याचा मुख्य उद्देश मानला जातो.

काही दिवसांपूर्वी तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात, चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ तैवानी संरक्षणदलांच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेऊन असल्याकडे लक्ष वेधले होते.

leave a reply