काश्मीरमधील टार्गेट किलिंगमध्ये सहभागी दोन दहशतवादी चकमकीत ठार

- • ‘एनआयए’कडून चार जणांना अटक • पुंछमधील ऑपरेशन दहाव्या दिवशीही सुरू

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षादलांनी केलेल्या कारवाईत लश्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी अलिकडेच काश्मीरमध्ये झालेल्या स्थलांतरीत मजूरांच्या हत्यांच्या दोन घटनांमध्ये सामील होते, अशी माहिती अधिकार्‍याने दिली. त्याचवेळी काश्मीरमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या टार्गेट किलिंग प्रकरणी ११ ठिकाणी छापेमारी केली आहे. या दरम्यान चार जणांना अटक करण्यात आली आहे.

काश्मीरमधील टार्गेट किलिंगमध्ये सहभागी दोन दहशतवादी चकमकीत ठारजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित, शिख समुदाय, तसेच स्थलांतरीत मजूरांना लक्ष्य करण्यास सुरूवात केल्यावर दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई हाती घेण्यात आली आहे. पुंछ आणि राजौरीच्या सीमा भागातील जंगलात दहशतवाद्यांच्या छुप्या ठिकाणांवर जोरदार कारवाई सुरू आहे. पुंछमधील ऑपरेशन दहाव्या दिवशीही सुरू होते. बुधवारी दहशतवाद्यांचा आणखी एक ठिकाणा सुरक्षादलांनी उडवून दिला. येथील करवाईत आतापर्यंत ९ जवानांना वीरमरण आले आहे. जम्मू-काश्मीरमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे ऑपरेशन म्हणून या लष्करी कारवाईकडे पाहिले जात आहे.

हे ऑपरेशन सुरू असताना जम्मू-काश्मीरमधील इतर भागातही विविध ठिकाणी छापेमारी व दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. अशाच शोध मोहिमेदरम्यान शोपियानच्या दरागड भागात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांचा आमनासामना झाला. यानंतर उडालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. तसेच लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे.

ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून हे दोघेही लश्कर-ए-तोयबाचे नाव बदललेले रुप असलेल्या द रजिस्टंट फ्रन्टचे (टीआरएफ) दहशतवादी असल्याची माहिती अधिकार्‍याने दिली आहे. यातील अदिल वाणी हा दहशतवादी जुलै २०२० मध्ये दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. तसेच शोपियान जिल्ह्यातील टीआरएफचा कमांडर होता. गेल्या दोन आठवड्यात काश्मीरमधील कारवाईत १५ दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे काश्मीर विभागाचे पोलीस महानिरिक्षक विजय कुमार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील निष्पाप नागरिकांच्या हत्यांप्रकरणात एनआयएने पुलवामा, कुलगाम, बारामुल्ला या तीन जिल्ह्यात ११ ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत सुहेर अहमद ठोकर, कमरान, अशरफ रेशी, रियद बशिर आणि हनान गुलझार दार या चार दहशतवाद्यांच्या पाठिराख्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन, अल बद्र व त्यांच्या संलग्न संघटनांच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. तसेच दहशतवाद्यांच्या शेकडो पाठिराख्यांचा समावेश आहे.

leave a reply