इस्रायलबरोबर सहकार्य करणाऱ्या युएई व बहारिनने परिणामांसाठी तयार रहावे

- इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी

तेहरान – संयुक्त अरब अमिरात (युएई) आणि बहारिनने इस्रायलबरोबर हातमिळवणी करुन आपले लष्करी तळ देखील इस्रायलला देण्याची तयारी केली आहे. युएई व बहारिनच्या या सहकार्याचा वापर करुन इस्रायलने एखादी चिथावणीखोर कारवाई केली तर त्याच्या परिणामांसाठी या दोन्ही देशांनी तयार रहावे, अशी धमकी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी दिली. त्याचबरोबर इस्रायलने गाझापट्टीत चढविलेल्या हवाई हल्ल्यांवर इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी टीका केली.

युएई व बहारिन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने दोन दिवसांपूर्वी इस्रायल, युएई आणि बहारिन यांच्यात ऐतिहासिक अब्राहम करार पार पडला. या करारानुसार इस्रायल, युएई व बहारिन यांच्यात राजनैतिक व व्यापारी स्तरावर सहकार्य प्रस्थापित केले जाणार आहे. इस्रायल व अरब देशांमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी हा करार केला असून यामुळे पॅलेस्टाईनच्या प्रश्नाला किंवा द्विराष्ट्रवादाच्या मुद्द्याला बगल दिली नसल्याचे युएई व बहारिनने स्पष्ट केले आहे. या करारामुळे पॅलेस्टाईनच्या मुद्यावर इस्रायलशी थेट चर्चा शक्य झाल्याचा दावा या दोन्ही देशांनी केला.

युएई व बहारिनपण इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी युएई व बहारिनने इस्रायलसोबत केलेल्या या करारावर घणाघाती प्रहार केले. ‘या क्षेत्रातील काही देशांच्या राज्यकर्त्यांना पॅलेस्टिनी बांधवांविषयी असलेली कृतज्ञता आणि आपल्या धर्माचा विसर पडला आहे. म्हणूनच या देशांनी इस्रायलशी हातमिळवणी केली. आता हे राज्यकर्ते आपल्या देशातील लष्करी तळ देखील इस्रायलला द्यायला तयार झाले आहेत. या चुकीमुळे इस्रायलने एखादी चिथावणीखोर कारवाई केली तर त्याच्या परिणामांसाठी या दोन्ही देशांनी तयार रहावे’, असे रोहानी यांनी धमकावले.

यानंतर इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही ताशेरे ओढले. ट्रम्प यांनी इराणशी केलेल्या अणुकराराबाबत स्वीकारलेल्या भूमिकेमुळे अमेरिका आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटी पडली आहे. युरोपिय देश इराणसोबत असून त्यांनी याआधीच अमेरिकेच्या भूमिकेचा विरोध केला आहे. केवळ इस्रायल आणि इतर काही छोट्या देशांचे समर्थन अमेरिकेला मिळत असून अमेरिकेच्या निर्बंधांचा इराणवर काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा रोहानी यांनी केला आहे.

leave a reply