युएईच्या परराष्ट्रमंत्र्यांची सिरियाला भेट

- अमेरिकेचे जोरदार टीकास्त्र

सिरियाला भेटदमास्कस/वॉशिंग्टन – बशर अल-अस्सादसारख्या क्रूर हुकुमशहाला पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना अमेरिका कधीही मान्यता देणार नाही, अशी खरमरीत टीका अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. अमेरिकेचा आखातातील सहकारी असणार्‍या संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) परराष्ट्रमंत्र्यांनी मंगळवारी सिरियाचा दौरा केला. या दौर्‍यात ‘युएई’चे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्लाह बिन झायेद यांनी सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल अस्साद यांची भेट घेतली. युएईच्या वरिष्ठ मंत्र्यांनी सिरियन राष्ट्राध्यक्षांची भेट घेण्याची गेल्या दशकभरातील ही पहिलीच वेळ आहे.

मंगळवारी ‘युएई’चे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्लाह बिन झायेद यांनी उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सिरियन राष्ट्राध्यक्षांची भेट घेऊन चर्चा केली. ‘सिरियाची एकजूट, स्थैर्य व सुरक्षेसाठी युएई उत्सुक आहे. सिरियातील संघर्ष थांबविण्यासाठी सुरू असलेल्या सर्व प्रयत्नांना युएईचे समर्थन राहिल. सिरियात स्थैर्य सिरियाला भेटप्रस्थापित होऊन सिरियन जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सहाय्य करू’, असे युएईचे परराष्ट्रमंत्री म्हणाल्याचे वृत्त सरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे. युएईच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार अन्वर गरगाश यांनी सिरिया दौर्‍याचे समर्थन केले आहे. जे तुटले आहे त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि संबंध अधिक मजबूत करण्यासाठी युएईचे प्रयत्न चालू राहितील, असे गरगाश यांनी स्पष्ट केले.

सिरिया सरकारनेही युएईच्या मंत्र्यांनी दिलेल्या भेटीचे स्वागत केले आहे. ‘दोन देशांमध्ये द्विपक्षीय संबंध व सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने चर्चा झाली. सहकार्याची नवी क्षितीजे खुली करून विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक व भागीदारीच्या मुद्यांवरही बोलणी झाली’, अशी माहिती सिरियन राष्ट्राध्यक्षांच्या वतीने देण्यात आली आहे. युएईच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अस्साद यांच्या नेतृत्त्वावर विश्‍वास व्यक्त करून युद्धानंतर सुरू असलेल्या पुनर्बांधणीच्या कार्याची प्रशंसा केल्याचेही सिरियन सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष अस्साद यांनी, युएईने सिरियाबाबत घेतलेल्या योग्य भूमिकेची प्रशंसा केल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला.

सिरियाला भेटयुएईचे परराष्ट्रमंत्री व शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीवर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे. ‘युएईच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सिरियाला दिलेली भेट व त्यातून देण्यात आलेले संदेश याबाबत अमेरिकेला तीव्र चिंता वाटते. बशर अल-अस्सादसारख्या क्रूर हुकुमशहाला पुन्हा प्रस्थापित करून संबंध सुरळीत करण्याच्या प्रयत्नांना अमेरिका कधीही समर्थन देणार नाही. आखातातील देशांनी अस्साद राजवटीच्या क्रौर्याची नीट दखल घेणे गरजेचे आहे. बशर अल अस्साद गेले दशकभर सिरियन जनतेवर अत्याचार करीत आहेत. सिरियाला सुरक्षा पुरविण्यात तसेच त्यातील जनतेला मानवतावादी सहाय्य मिळवून देण्यात सिरियन राजवट अपयशी ठरली आहे’, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी दिली. त्याचवेळी अमेरिका सिरियन राजवट तसेच त्यांच्याशी व्यवहार करणार्‍यांवरील निर्बंधांची कारवाई थांबविणार नाही, असा इशाराही प्राईस यांनी दिला.

युएईने २०१८ सालापासून अस्साद राजवटीबरोबरील संबंध सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत. २०१८ साली युएईने सिरियात दूतावास सुरू केला होता. त्यानंतर युएईने सिरियाला पुन्हा एकदा अरब लीगमध्ये सहभागी करून घ्यावे, अशी मागणीही केली होती. गेल्या महिन्यात सिरियाच्या वाणिज्यमंत्र्यांनी ‘दुबई एक्स्पो’मध्ये युएईच्या वाणिज्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. युएईव्यतिरिक्त इजिप्त व जॉर्डन या देशांकडूनही सिरियाच्या अस्साद राजवटीबरोबरील संबंध सुधारण्याच्या हालचाली सुरू आहेत. सप्टेंबर महिन्यात इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सिरियन परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात जॉर्डनचे ‘किंग अब्दुल्लाह’ यांनी राष्ट्राध्यक्ष अस्साद यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे समोर आले होते. जॉर्डनने सिरियाबरोबरील आपल्या सीमाही व्यापारासाठी खुल्या करण्याचा निर्णय घेतला होता.

leave a reply