अमेरिकेने चिनी लष्कराशी संबंधित असलेल्या कंपन्या ‘ब्लॅकलिस्ट’ केल्या

- ‘शाओमी’, ‘सीएनओओसी’ व ‘कोमॅक’सारख्या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश

वॉशिंग्टन/बीजिंग – आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेला पिछाडीवर टाकून महासत्ता बनण्याच्या चीनच्या इराद्यांना नवा धक्का बसला आहे. गुरुवारी अमेरिकेने चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’शी संबंध असणार्‍या नऊ कंपन्यांना ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकल्याची घोषणा केली. त्याचवेळी इंधनक्षेत्रातील आघाडीच्या कंपनीवर निर्बंध टाकण्यात येत असल्याचेही जाहीर केले. चीनच्या लष्कराशी संबंधित असलेल्या कंपन्या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहेत, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या अध्यादेशात म्हटले आहे.

पुढील आठवड्यात अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन सत्तेची सूत्रे हाती घेणार आहेत. बायडेन यांच्या काळात चीनविरोधातील कारवाईची तीव्रता कमी होण्याचे संकेत विश्‍लेषकांकडून देण्यात येत आहेत. ही शक्यता लक्षात घेऊन विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व प्रशासनाने चीनविरोधातील कारवाईची धार दिवसेंदिवस अधिक तीव्र करण्यास सुरुवात केली आहे. चीनमधून होणारी आयात, चिनी कंपन्यांची गुंतवणूक, मानवाधिकारांचे उल्लंघन यासारख्या मुद्यांवरून चीनला लक्ष्य करण्यात येत आहेत.

गुरुवारी अमेरिकेच्या संरक्षण व वाणिज्य विभागाने एकापाठोपाठ एक आदेश जारी करून चिनी कंपन्यांविरोधातील कारवाईची घोषणा केली. संरक्षण विभागाने चीनच्या लष्कराशी संबंधित असलेल्या कंपन्यांची नवी ब्लॅकलिस्ट जाहीर केली. ‘कम्युनिस्ट चायनीज मिलिटरी कंपनीज्’ नावाच्या या यादीत नऊ कंपन्यांची नावे आहेत. त्यात स्मार्टफोन क्षेत्रात जगातील तिसर्‍या क्रमांकाची कंपनी असणार्‍या ‘शाओमी’चा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त चीनच्या हवाईक्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या ‘चायना नॅशनल अ‍ॅव्हिएशन होल्डिंग कंपनी लिमिटेड’ व ‘कोमॅक’वरही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सदर कंपन्यांना अमेरिकी कंपन्यांबरोबर कोणत्याही प्रकारचे व्यवहार करता येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या कारवाईवर ‘शाओमी’कडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून आपला चिनी लष्कराशी संबंध नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. तर ‘चायना नॅशनल अ‍ॅव्हिएशन होल्डिंग कंपनी लिमिटेड’ व ‘कोमॅक’वरील कारवाईने स्वतंत्र प्रवासी विमान विकसित करण्याच्या चीनच्या इराद्यांना धक्का बसल्याचा दावा विश्‍लेषकांनी केला आहे. ‘कोमॅक’ने नुकतेच नवे प्रवासी विमान विकसित केले असून ‘बोईंग’ व ‘एअरबस’ या आघाडीच्या कंपन्यांना आव्हान देण्याचे दावे केले होते.

संरक्षण विभागापाठोपाठ वाणिज्य विभागानेही चीनच्या दोन कंपन्यांवर कारवाईची घोषणा केली आहे. यात इंधनक्षेत्रातील प्रमुख कंपनी ‘सीएनओओसी’ व ‘स्कायरिझॉन’ यांचा समावेश आहे. ‘सीएनओओसी’वर ‘साऊथ चायना सी’मध्ये कारवाया करीत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर ‘स्कायरिझॉन’वर चिनी लष्कराला आधुनिकीकरणासाठी सहाय्य करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या दोन्ही कंपन्यांच्या कारवाया अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे वाणिज्यमंत्री विल्बर रॉस यांनी बजावले.

leave a reply