युक्रेनच्या क्रिमिआवरील रशियाच्या ताब्याला अमेरिका मान्यता देणार नाही

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन

वॉशिंग्टन – 2014 साली रशियाने युक्रेनचा भूभाग असलेल्या क्रिमिआचा उपद्विप बळकावला होता. याला अमेरिका कधीही मान्यता देणार नाही. आपला सहकारी देश असलेल्या युक्रेनच्या मागे अमेरिका ठामपणे उभी राहिल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जाहीर केले. युक्रेनची राजधानी किव्ह येथे अतिआक्रमक मानल्या जाणार्‍या उजव्या गटांची तीव्र निदर्शने सुरू आहेत. या निदर्शनांना रशियाचा पाठिंबा असल्याचे दावे केले जातात. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी क्रिमिआवरून रशियाला दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर ज्यो बायडेन यांनी चीन हा अमेरिकेचा स्पर्धक देश असल्याचे सांगून रशिया अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे घोषित केले होते. याद्वारे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आपले परराष्ट्र धोरणच स्पष्ट केल्याचे विश्‍लेषकांनी म्हटले होते. आधीचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रशियापेक्षाही चीनकडून अमेरिकेला अधिक धोका असल्याचे सांगून चीनला लक्ष्य करणारी धोरणे स्वीकारली होती. पण बायडेन यांनी या धोरणात बदल करून रशिया हाच अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे सांगून रशियाच्या विरोधात आक्रमक पावले टाकण्याची सुरूवात केल्याचे दिसते.

आधीच्या प्रशासनाने जशी रशियासमोर लोळण घेतली होती, तसे बायडेन प्रशासन करणार नाही, असा इशारा राष्ट्राध्यक्ष बायडेन व त्यांचे सहकारी देत आहेत. युक्रेनच्या क्रिमिआवरून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशियाला दिलेला नवा इशारा याची साक्ष देत आहे. 2014 साली रशियाने आक्रमण करून क्रिमिआचा उपद्विप युक्रेनपासून तोडला व रशियाशी जोडून घेतला होता. याचे फार मोठे पडसाद उमटले होते. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी रशियावर काही निर्बंधही लादले होते. मात्र रशियाच्या लष्करी कारवाईला उत्तर देण्याची धमक अमेरिका व दुसर्‍या कुठल्याही देशाने दाखविली नव्हती.

याला सात वर्षे झाली असून त्याचे औचित्य साधून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन क्रिमिआचा मुद्दा पुन्हा उपस्थित करीत आहेत. रशियाच्या क्रिमिआवरील अनाधिकृत ताब्याला अमेरिका कधीही मान्यता देणार नाही. अमेरिका आपला सहकारी देश असलेल्या युक्रेनच्या मागे ठामपणे उभी राहिल, अशी ग्वाही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिली आहे. बायडेन यांच्याकडून रशियाच्या विरोधात ही टीका केली जात असताना, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी रशियाची वाढती असहिष्णुता व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी धोकादायक असल्याचा दावा केला.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे टीकाकार असलेल्या बोरिस नेमत्सेव्ह यांची 27 फेब्रुवारी 2015 रोजी हत्या झाली होती. त्याचे औचित्य साधून ब्लिंकन यांनी रशियावर ही टीका केली. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना आव्हान देणारे अ‍ॅलेक्सी नॅव्हेल्नी सध्या रशियन तुरुंगात आहेत. त्याचा दाखला देऊन रशियातील परिस्थितीवर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी व विरोधकांवरील कारवाईच्या मुद्यावर बायडेन प्रशासन रशियाला लक्ष्य करू लागल्याचे दिसत आहे. उघूरवंशियाचा वंशसंहार व मानवाधिकारांचे सर्रास हनन करणार्‍या चीनबाबत इतकी कठोर भूमिका घेण्यास बायडेन प्रशासन तयार नाही. या विरोधाभासावर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे विरोधक बोट ठेवत आहेत. यावर अद्याप बायडेन यांच्या प्रशासनाकडून समाधानकारक खुलासा आलेला नाही.

leave a reply