रशियाकडून ‘एस-400’ खरेदी करणाऱ्या तुर्कीवर अमेरिकेकडून आर्थिक निर्बंधांची घोषणा

निर्बंधांची घोषणावॉशिंग्टन/अंकारा – अमेरिकेच्या इशाऱ्याची पर्वा न करता रशियाकडून ‘एस-400’ हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी व तैनात करणाऱ्या तुर्कीवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी तुर्कीवरील या निर्बंधांची घोषणा केली. तुर्कीचे रशियाबरोबरील हे व्यवहार अमेरिका व नाटोच्या सदस्य देशांच्या सुरक्षेसाठी घातक ठरत असल्यामुळे या निर्णय घेतल्याचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी स्पष्ट केले. तर आपल्यावर निर्बंध लादून अमेरिकेने गंभीर चूक केली आहे आणि अमेरिकेच्या या कारवाईला प्रत्युत्तर मिळेल, अशी धमकी तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

निर्बंधांची घोषणा2017 साली तुर्कीने रशियाबरोबर ‘एस-400’च्या खरेदीचा करार केला होता. अमेरिकेच्या पॅट्रियॉट या हवाई सुरक्षा यंत्रणेऐवजी तुर्कीने ‘एस-400’ची निवड केली होती. अमेरिकेच्या विरोधात जाऊन राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर तुर्की आणि अमेरिकेतील संबंध बिघडले होते. अमेरिकेने वारंवार इशारे देऊन तुर्कीने रशियाबरोबरच्या करारातून माघार घेतली नाही. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ‘एस-400’च्या बॅटरीज्‌ तुर्कीमध्ये दाखल झाली. यानंतर अमेरिकेने ‘एफ-35’ या अतिप्रगत स्टेल्थ लढाऊ विमानांच्या सहकार्यातून तुर्कीची हकालपट्टी केली होती. सदर कारवाई म्हणजे अमेरिकेने तुर्कीला दिलेला इशारा असल्याचा दावा विश्‍लेषकांनी केला होता.

निर्बंधांची घोषणा

पण नाटोचा सदस्य देश असलेल्या तुर्कीने रशियाबरोबरचे लष्करी सहकार्य सुरू ठेवल्यानंतर खवळलेल्या अमेरिकेने तुर्कीवर निर्बंध लादण्याची तयारी सुरू केली. गेल्याच आठवड्यात अमेरिकेच्या सिनेटने तुर्कीवरील निर्बंधांना मंजूरी देण्याचे स्पष्ट केले. सोमवारी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी या निर्बंधांची अधिकृतरित्या घोषणा केली. ‘एस-400’ची तुर्कीतील तैनाती अमेरिकेचे लष्करी तंत्रज्ञान आणि अमेरिकी सैनिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरते. त्याचबरोबर या व्यवहारांमुळे तुर्कीने रशियाच्या संरक्षण क्षेत्राला पैसा मिळवून दिला, अशी टीका अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली. यासह अमेरिकेने तुर्कीच्या सरकारशी संलग्न शस्त्रनिर्मिती कंपनी तसेच संघटना आणि तीन अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले आहेत.

अमेरिकेच्या या निर्बंधांवर तुर्कीने टीका केली तसेच योग्य वेळी अमेरिकेला उत्तर दिले जाईल, असे धमकावले. दरम्यान, इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी तुर्कीवरील अमेरिकेच्या या निर्बंधांचा निषेध केला. तसेच इतरांवर निर्बंध लादण्याची आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करण्याची अमेरिकेला खोड असल्याची टीका झरिफ यांनी केली.

leave a reply