अफगाणिस्तानातील आपल्या नागरिकांना अमेरिका आणि ब्रिटनचा इशारा

ब्रिटनचा इशाराकाबुल – ‘आयएस’चे दहशतवादी अफगाणिस्तानात मागे राहिलेल्या परदेशी नागरिकांना लक्ष्य करू शकतात. त्यामुळे अफगाणिस्तानातील मोठमोठ्या हॉटेलमध्ये राहणार्‍या परदेशी नागरिकांनी त्वरीत तेथून बाहेर पडावे, काबुलचे सेरेना हॉटेल सोडून द्यावे, असा इशारा अमेरिका व ब्रिटनने जारी केला. गेल्या आठवड्यात आयएसच्या दहशतवाद्याने कुंदूझ येथील प्रार्थनास्थळावर चढविलेल्या भीषण आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका व ब्रिटनने हा इशारा दिल्याचा दावा केला जातो. तर दोहा येथे पार पडलेल्या तालिबानबरोबरच्या बैठकीनंतर अमेरिकेने आपल्या नागरिकांना सावध केल्याचे काही विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

अमेरिका व ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयांनी सोमवारी स्वतंत्र इशारा प्रसिद्ध केला. यापैकी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने उघडपणे सेरेना हॉटेलचा उल्लेख करून अमेरिकी नागरिकांना सदर हॉटेल सोडण्याचे तसेच या हॉटेलपासून दूर राहण्याची सूचना केली. तर ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने काबुलमधील हॉटेलमध्ये राहण्याचा धोका पत्करू नका, ब्रिटनचा इशाराविशेषत: सेरेना हॉटेल सोडून द्या, असे बजावले. या दोन्ही देशांनी सेरेना हॉटेलचा उल्लेख केल्यामुळे या इशार्‍याचे गांभीर्य वाढले आहे.

ऑगस्ट महिन्यात अमेरिका व ब्रिटनच्या सैन्यमाघारीबरोबर या देशांचे बहुतांश नागरिकही माघारी परतले होते. पण अजूनही काही नागरिक अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या भागात अडकल्याचा दावा केला जातो. तर काही नागरिक स्वयंसेवी तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांअंतर्गत अफगाणिस्तानात काम करीत आहेत. सदर अमेरिकी व ब्रिटिश कर्मचारी आणि अधिकारी सेरेना हॉटेलचा वापर करतात. याशिवाय परदेशी नागरिकांचीही या हॉटेलमध्ये मोठी गर्दी असते.

दीड महिन्यांपूर्वी तालिबानने या हॉटेलचा ताबा मिळविला होता. तेव्हापासून या हॉटेलच्या सुरक्षेची जबाबदारी तालिबानवर आहे. गेल्या आठवड्यात आयएसच्या दहशतवाद्याने कुंदूझ ब्रिटनचा इशारायेथील शियापंथीयांच्या प्रार्थनास्थळावर आत्मघाती हल्ला चढविला. या स्फोटात किमान शंभर जणांचा बळी गेला. अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीविरोधात यापुढेही असे हल्ले चढविले जातील, असा इशारा आयएसने दिला होता. त्यामुळे आयएसचे दहशतवादी सेरेना हॉटेलला लक्ष्य करतील, अशी चिंता अमेरिका व ब्रिटनला सतावित असावी, असा दावा केला जातो.

याआधी २०१४ साली तालिबानच्याच दहशतवाद्यांनी सेरेना हॉटेलवर हल्ला चढविला होता. यामध्ये नऊ तर २००८ साली या हॉटेलवर झालेल्या आत्मघाती स्फोटात सहा जणांचा बळी गेला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात सेरेना हॉटेल चर्चेमध्ये आले होते. तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यानंतर तालिबानच्या बरादर व हक्कानी गटांमध्ये सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला होता. त्यावेळी हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेचा आपल्या हितांसाठी वापर करणार्‍या ‘आयएसआय’ या कुख्यात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख फैझ हमीद सेरेना हॉटेलमध्ये दाखल झाले होते.

leave a reply