अमेरिका, ब्रिटनच्या विमानवाहू युद्धनौकांचा जपानजवळ सराव

विमानवाहूटोकिओ – गेल्या तीन दिवसांमध्ये तैवानच्या हवाईहद्दीत जवळपास १०० लढाऊ विमानांची घुसखोरी घडवून चीनने इथले वातावरण तणावपूर्ण बनविले आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडने जपानच्या ओकिनावा बेटांजवळ युुद्धसराव आयोजित करून चीनला इशारा दिला. अमेरिका व ब्रिटनच्या तीन विमानवाहू युद्धनौका या सरावाचे नेतृत्व करीत असून एकूण १७ युद्धनौका यात सहभागी झाल्या आहेत.

अमेरिकेच्या ‘युएसएस रोनाल्ड रिगन’, ‘युएसएस कार्ल विन्सन’ आणि ब्रिटनची ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’ या विमानवाहू युद्धनौकांनी सोमवारपासून फिलिपाईन्स सी ते ओकिनावाच्या सागरी क्षेत्राजवळ सराव केला. यामध्ये जपानची ‘जेएस इसे’ ही ऍम्फिबियस युद्धनौका तसेच कॅनडा, न्यूझीलंड आणि नेदरलँडच्या विनाशिका देखील या सरावात सहभागी होत्या. हवाई सुरक्षा, पाणबुडीविरोधी युद्ध तसेच सामरिक योजनांबाबतचा सराव यावेळी पार पडला.

गेल्या काही आठवड्यांपासून चीन तैवानच्या हद्दीत विमाने घुसविण्यापासून ते इंडो-पॅसिफिक क्षेत्रात बेलगाम कारवाया करीत सुटला आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडने ब्रिटन, जपान या मित्रदेशांसह युद्धसराव आयोजित करून चीनला इशारा दिल्याचे दिसते. लवकरच ‘क्वाड’च्या सदस्य देशांच्या युद्धनौका देखील या सागरी क्षेत्रात स्वतंत्र सराव करणार आहेत.

leave a reply