हाँगकाँगच्या १२ लोकशाहीवादी कार्यकर्त्यांच्या अटकेवरून अमेरिकेची चीनवर टीका

वॉशिंग्टन/बीजिंग – हाँगकाँगच्या १२ लोकशाहीवादी समर्थकांना गेल्या महिन्यात चीनने अटक केली होती. यावरून अमेरिकेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या कार्यकर्त्यांच्या मानवाधिकारांचे हनन केला जात असल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी केला. अमेरिकेच्या या आरोपांवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आपण बंडखोरांना अटक केल्याचे उत्तर दिले आहे. त्याचवेळी चीनने अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या हालचालींवर आणखी निर्बंध आणले आहेत. यामुळे हाँगकाँग मुद्द्यावरून अमेरिका आणि चीन मधील वाद अधिकच चिघळला आहे.

लोकशाहीवादी

जुलै महिन्यात चीनने हाँगकाँगमध्ये ‘नॅशनल सिक्युरिटी लॉ’ लागू केल्यापासून जगभरातून परसात उमटत आहेत. चीनने या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या आणि या कायद्याचा विरोध करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड केली आहे. हाँगकाँगमधील लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना पकडून कारागृहात डांबण्यात येत आहे. चीनने ‘नॅशनल सिक्युरिटी लॉ’च्या आडून सुरू केलेल्या ह्या दडपशाहीवर जगभरातून टीका होत आहे.

गेल्या महिन्यात चीनच्या गुआंगडोंग प्रांतात तेथील मेरीटाईम पोलिसांनी हाँगकाँगच्या १२ लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना अटक केली होती. हे लोकशाहीवादी कार्यकर्ते राजकीय आश्रयासाठी तैवानच्या दिशेने जात असल्याचे सांगितले जाते. ”या सर्वांना अटक झाल्यापासून त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांची कोणतीही माहिती चीनने उघड केलेले नाही. तसेच त्यांच्यापर्यंत कोणतेही वकील सहाय्य होऊ दिले नाही. हाँगकाँगच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरी लॅम यांच्या हाँगकाँग वासियांच्या अधिकाराचे संरक्षण करण्याच्या प्रतिबद्धतेवर यामुळे प्रश्न उपस्थित होतो. ”, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी म्हटले आहे.

लोकशाहीवादी

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॉर्गन ओर्टगस यांनी हाँगकाँगमध्ये सुरू असलेल्या दडपशाहीचे हे आणखीन एक उदाहरण असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेकडून करण्यात आलेला या टीकेनंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आले असून या बारा जणांना बेकायदेशीररित्या सागरी सीमा ओलांडताना अटक करण्यात आली आहे. हे बारा जण लोकशाहीवादी कार्यकर्ते नाहीत, तर हाँगकाँगला चीनपासून वेगळे करण्यासाठी गुंतलेले बंडखोर आहेत, असे चीनने म्हटले आहे. मात्र या बारा जणांच्या नातेवाईकांनीही चीनच्या प्रशासनावर गंभीर आरोप केले असून हा सर्वांना सोडण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, अमेरिका आणि चीनमध्ये हाँगकाँगवरून सुरू असलेला राजनैतिक संघर्ष अधिकच चिघळला आहे. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने चीन आणि हाँगकाँगमध्ये काम करत असलेल्या अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या हालचालींवर निर्बंध आणले आहेत. याआधीच अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांवर निर्बंध लावले होते. त्यामध्ये या नव्या निर्बंधांचे घोषणा करण्यात आली आहे.

leave a reply