अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्री भारताच्या भेटीवर

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या अमेरिका भेटीनंतर, अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्री वेंडी शर्मन भारताच्या दौर्‍यावर आल्या आहेत. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल व परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रिंगला यांची भेट घेऊन वेंडी शर्मन यांनी चर्चा केली. अफगाणिस्तानबाबत भारत व अमेरिकेचे धोरण एकसमान असल्याची ग्वाही यावेळी शर्मन यांनी दिली. भारताच्या सुरक्षाविषयक चिंता हा अमेरिकेच्या प्राधान्याचा विषय ठरतो, असे अमेरिकी उपपराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्री भारताच्या भेटीवरभारतीय संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांचा अमेरिका दौरा ऐतिहासिक ठरला, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी नुकतेच म्हटले होते. दोन्ही देशांमध्ये विकसित झालेले सहकार्य अफगाणिस्तानातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर अत्यंत महत्त्वाचे ठरते व अफगाणिस्तान हा उभय देशांमधील चर्चेतील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, असे संकेत भारत व अमेरिकाही देत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, उपपरराष्ट्रमंत्री वेंडी शर्मन यांची ही भारतभेट लक्ष वेधून घेत आहे. मुख्य म्हणजे शर्मन पाकिस्तानलाही भेट देणार असल्याचे सांगितले जाते. यामुळे त्यांच्या या दौर्‍याकडे पाकिस्तान संशयाने पाहत असल्याचे दिसते.

अफगाणिस्तानातून दहशतवाद फैलावण्याचा धोका वाढलेला आहे, ही अशी चिंता भारत व्यक्त करीत आहे. अफगाणिस्तानात दहशतवाद्यांचा सुरक्षित स्वर्ग बनता कामा नये, अशी भारताची मागणी आहे. हे अमेरिकेलाही मान्य असून याबाबत भारत व अमेरिकेचे धोरण एकसमान आहे. यासाठी अमेरिका जबरदस्त योजना तयार करीत आहे, असे वेंडी शर्मन यांनी स्पष्ट केले. जवळपास याच शब्दात अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी अमेरिकी सिनेटसमोरील सुनावणीत आपली भूमिका मांडली होती. त्यामुळे अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांवर हवाई हल्ले चढविण्याची तयारी अमेरिका करीत असल्याचे संकेत मिळाले होते.

या हल्ल्यांसाठी अमेरिकेला भारताची हवाई हद्द मिळावी, यासाठी अमेरिकेचे नेते प्रयत्न करीत आहेत. वेंडी शर्मन यांचा हा दौरा यासाठीच असल्याची चर्चा सुरू झाली होती. पाकिस्तानच्या माध्यमांनी याला विशेष प्रसिद्धी दिली आहे. तसेच वेंडी शर्मन आपल्या भेटीत पाकिस्तानला धमकावणार असल्याची चिंताही व्यक्त केली जाते. त्यामुळे अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांच्या या दौर्‍याचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले आहे.

leave a reply