चीनच्या युद्धनौका सायबर हल्ल्यांद्वारे बंदरातच रोखण्याची क्षमता अमेरिका प्राप्त करील

- अमेरिकेच्या नौदल सचिवांचा दावा

चीनच्या युद्धनौकाऍनापोलीस – अमेरिकेच्या नौदलाने आक्रमक बनलेल्या चीनच्या नौदलाला रोखण्यासाठी सामरिक मार्गदर्शक दस्तावेज तयार केले आहेत. यानुसार, सायबर हल्ले चढवून चीनच्या युद्धनौकांना बंदरातच खिळवून ठेवता येऊ शकते, असा दावा अमेरिकन नौदलाचे सचिव कार्लोस डेल टोरो यांनी केला. अमेरिकन नौदलाच्या या तयारीची दखल घेऊन चीनच्या मुखपत्राने अमेरिकेला धमकावले आहे. चीनची कोंडी करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न यशस्वी ठरणार नसल्याचा दावा या मुखपत्राने केला.

२०२२ सालच्या हिवाळी ऑलिंपिकनंतर चीन तैवानवर हल्ला चढवू शकतो, असा इशारा अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी काही दिवसांपूर्वीच दिला. अमेरिका, युरोप तसेच तैवानचे नेते व लष्करी विश्‍लेषक देखील चीनच्या तैवानवरील हल्ल्याची शक्यता वर्तवित आहेत. तैवानच्या हवाईहद्दीत चार दिवसात जवळपास दीडशे लढाऊ विमानांची चीनच्या युद्धनौकाघुसखोरी घडवून चीनने आपले इरादे स्पष्ट केले. त्याचबरोबर चीनच्या विमानवाहू युद्धनौकेने आपल्या विनाशिकांच्या ताफ्यासह तैवानच्या सागरी क्षेत्राजवळून प्रवास केला होता.

चीनच्या या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी अमेरिकेचे नौदल लवकरच सामरिक मार्गदर्शक योजना जाहीर करणार आहे. अमेरिकेचे नौदल सचिव कार्लोस डेल टोरो यांनी दोन दिवसांपूर्वी नौदलाच्या एका कार्यक्रमात बोलताना यासंबंधीची माहिती दिली. येत्या काळात अमेरिकेचे नौदल आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपले वर्चस्व कायम राखून मित्रदेशांबरोबर सामरिक भागिदारी मजबूत करील, असा दावा टोरो यांनी केला.

चीनच्या युद्धनौका‘चीनबरोबर युद्ध पुकारणे हे काही आमचे उद्दिष्ट नाही. पण तैवानचा ताबा घेण्यापासून चीनला रोखणे, ही आमची महत्त्वाची जबाबदारी आहे’, असे टोरो म्हणाले. त्याचबरोबर अमेरिकेच्या विनाशिकांची संख्या वाढविण्यापेक्षा, या नवनवीन तंत्रज्ञानाने या विनाशिका अतिप्रगत करणे महत्त्वाचे असल्याचे नौदल सचिव टोरो यांनी सांगितले. सायबर क्षेत्रातील गुंतवणूक महत्त्वाची असल्याचे सांगून सायबर हल्ल्यांद्वारे चीनच्या युद्धनौका बंदराबाहेरच पडणार नाहीत, यावर विचार करता येऊ शकतो, असा दावा टोरो यांनी केला.

दरम्यान, अमेरिकेच्या नौदल सचिवांच्या या इशार्‍याची ‘ग्लोबल टाईम्स’ या चीनच्या मुखपत्राने दखल घेतली. ‘नव्या शस्त्रास्त्रांची निर्मिती करण्यात अमेरिका नेहमीच आघाडीवर राहिली आहे. पण अमेरिकेने तैवानप्रकरणी हस्तक्षेप केला तर त्यांचा पराभव होईल. चीनबरोबर युद्ध पेटलेच तर परदेशातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर मोठे हल्ले चढविले जातील. अमेरिकेचे नौदल बॉम्बर किंवा लढाऊ विमाने रवाना करील. पण चीनच्या लष्करावर हल्ले चढविण्याची त्यांच्यात हिंमत नसेल’, अशी धमकी चिनी मुखपत्राने दिली आहे.

leave a reply