अमेरिका व ग्रीसदरम्यान संरक्षण सहकार्य वाढविणार्‍या करारावर स्वाक्षर्‍या

वॉशिंग्टन/इस्तंबूल – अमेरिकेबरोबरील संरक्षणसहकार्याची व्याप्ती वाढविणार्‍या नव्या करारावर ग्रीसने स्वाक्षरी केली आहे. नव्या करारानुसार, दोन देशांमध्ये यापूर्वी झालेल्या ‘म्युच्युअल डिफेन्स कोऑपरेशन ऍग्रीमेंट’ला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचवेळी अमेरिकेला मध्य ग्रीसमधील दोन संरक्षणतळांचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अमेरिकेतील कार्यक्रमादरम्यान, ग्रीसच्या मंत्र्यांनी तुर्कीकडून सुरू असलेल्या कारवायांचा उल्लेख करताना ‘ग्रीस इज ऍट वॉर’ असा उघड दावा केला. त्यांच्या या वक्तव्यावर तुर्कीतून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, तुर्की माध्यमांनी ग्रीसला धमकावले आहे.

अमेरिका व ग्रीसदरम्यान संरक्षण सहकार्य वाढविणार्‍या करारावर स्वाक्षर्‍यागुरुवारी वॉशिंग्टनमध्ये पार पडलेल्या बैठकीदरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन व ग्रीसचे परराष्ट्रमंत्री निकॉस डेन्दिआस यांनी करारावर स्वाक्षर्‍या केल्या. यावेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी, नव्या करारामुळे भूमध्य सागरी क्षेत्र व त्यापलिकडील क्षेत्रात स्थैर्य तसेच सुरक्षा कायम राखण्यासाठी ग्रीस आणि अमेरिका सक्रिय राहू शकेल, अशी ग्वाही दिली. ग्रीसबरोबरील कराराने दोन्ही देशांची संरक्षणदले भक्कम व सक्षम करण्यासाठी असलेल्या भागीदारीची व्याप्ती अधिक वाढली आहे, असेही ब्लिंकन पुढे म्हणाले. तर ग्रीसचे परराष्ट्रमंत्री निकॉस डेन्दिआस यांनी, अमेरिकेबरोबरील करार ग्रीसचे हितसंबंध सुरक्षित राखणारा असल्याचा दावा केला.

यावेळी तुर्कीकडून ग्रीसला दररोज चिथावणीखोर कारवायांना तोंड द्यावे लागत असल्याचा ठपकाही ग्रीसच्या मंत्र्यांनी ठेवला. त्यामुळेच आपल्या सार्वभौमत्त्वाचे रक्षण करण्यासाठी ग्रीस तुर्कीविरोधात युद्धासाठी सज्ज आहे, असा इशाराही त्यांनी दिला. परराष्ट्रमंत्री निकॉस डेन्दिआस यांच्या या इशार्‍यावर तुर्की माध्यमांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून त्यांनी ग्रीसला धमकावण्यास सुरुवात केली आहे. ‘येनी सफक’ या वृत्तपत्राने अमेरिका-ग्रीस कराराचे वृत्त देतानाच ‘वुई आर रेडी फॉर वॉर’ असा मथळा दिला आहे. तकविम या दैनिकाने कराराचे वृत्त देताना, तुर्कीचे शत्रू एका चौकटीत उभे असल्याचे वक्तव्य केले आहे.

काही दिवसांपूर्वीच ग्रीसने फ्रान्सबरोबरही संरक्षण करारावर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. या करारावरही तुर्कीने आक्रमक प्रतिक्रिया नोंदविताना ग्रीसला धमकावले होते. राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी तुर्कीची जहाजे पुन्हा भूमध्य सागरी क्षेत्रातील मोहिमेसाठी पाठविण्याचे निर्देशही दिले होते. एर्दोगन यांच्या या निर्देशांमुळे या क्षेत्रातील तणाव अधिक वाढण्याचे संकेत मिळाले आहेत.

दरम्यान, ग्रीसबरोबरील संरक्षण कराराचा उल्लेख करताना काही अमेरिकी विश्‍लेषकांनी चीनच्या धोक्याकडेही लक्ष वेधले आहे. चीनने ग्रीसमधील सर्वात मोठ्या पिराअस बंदरात मोठी गुंतवणूक करून त्यावर ताबा मिळविला आहे. चीनचा हा ताबा कम्युनिस्ट राजवटीच्या युरोपमधील महत्त्वाकांक्षी योजनांचा भाग मानला जातो. त्यामुळे या क्षेत्रात अमेरिकेने संरक्षणतैनाती वाढविणे महत्त्वाचे ठरते, असे विश्‍लेषकांनी म्हटले आहे.

गेल्या काही वर्षात करण्यात आलेल्या विविध सर्वेक्षणांमधून भूमध्य सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात इंधनाचे साठे असल्याचे समोर आले आहे. त्यातील अधिकाधिक साठ्यांवर ताबा मिळविण्यासाठी तुर्कीने गेल्या वर्षापासून आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. भूमध्य सागरात ग्रीस व सायप्रसच्या हद्दीतील इंधनसाठ्यांवर तुर्कीने आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात व त्यानंतर तुर्कीने ‘रिसर्च शिप’ तसेच युद्धनौका पाठवून भूमध्य सागरात एकापाठोपाठ मोहिमा राबविण्यास सुरुवात केली होती. तुर्कीच्या या कारवायांवर आक्षेप घेऊन ग्रीसने भूमध्य सागरातील आपली संरक्षण तैनाती वाढविली होती. त्यानंतर ग्रीसने फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती, इस्रायल, इजिप्त यासारख्या देशांबरोबर सामरिक सहकार्य मजबूत करण्यावरही भर दिला होता.

leave a reply