अमेरिका ग्रीसच्या संरक्षणतळावरील तैनाती वाढविणार

- ग्रीसच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा

संरक्षणतळावरील तैनातीअथेन्स/वॉशिंग्टन – अमेरिकेकडून ग्रीसमधील संरक्षणतळांवरील तैनाती वाढविण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या आठवड्यात ग्रीसचे परराष्ट्रमंत्री अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार आहेत. या दौर्‍यात दोन देशांमधील संरक्षण कराराची मुदत वाढविणार्‍या करारावर स्वाक्षर्‍या होतील, असे सांगण्यात येते. गेल्याच महिन्यात ग्रीसने फ्रान्सबरोबर व्यापक संरक्षण सहकार्य करार केला होता. त्यापाठोपाठ अमेरिकेबरोबरील कराराला देण्यात येणारी मुदतवाढ तुर्कीविरोधातील सज्जतेचा भाग असल्याचे सांगण्यात येते.

अमेरिकेचे ग्रीसमध्ये चार संरक्षणतळ आहेत. त्यात क्रेटे बेटावरील नौदल तळ व लारिसावरील हवाईतळ यांच्यासह अलेक्झांड्रोपोली बंदर तसेच स्टेफानोविकिओवरील तळाचा समावेश आहे. अमेरिकेने ग्रीसमध्ये अजून एक संरक्षणतळ उभारावा, असा प्रस्ताव ग्रीक सरकारकडून देण्यात आला होता. मात्र त्याऐवजी सध्या कार्यरत असलेल्या तळांची क्षमता वाढविण्यासाठी अतिरिक्त गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, या तळांवरील अमेरिकी संरक्षणयंत्रणा तसेच जवानांची संख्या वाढविण्याचे संकेत देण्यात आले आहेत. ग्रीसचे संरक्षणमंत्री निकॉस पेनागिओतोपोलस यांनी यासंदर्भात माहिती दिली.

ग्रीसचे परराष्ट्रमंत्री निकॉस डेन्दिआस १४ ऑक्टोबरला अमेरिकेला भेट देणार आहेत. यावेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांच्यासोबत चर्चा होणार असून त्यात संरक्षण सहकार्य कराराला अंतिम रुप मिळेल, असे सांगण्यात येते. ग्रीस व अमेरिकेमध्ये यापूर्वीच ‘म्युच्युअल डिफेन्स कोऑपरेशन ऍग्रीमेंट’ झाले असून नवा करार त्याची मुदत वाढविण्याच्या प्रक्रियेचा भाग असल्याचे सूत्रांनी सांगितले. यात काही नव्या तरतुदींचाही समावेश असण्याचे संकेत देण्यात आले आहेत. अमेरिकेबरोबरील हे सहकार्य, तुर्कीच्या कारवायांविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडी उभी करण्यासाठी ग्रीसकडून उचलण्यात येणार्‍या पावलांचा भाग मानला जातो.

गेल्या काही वर्षात करण्यात आलेल्या विविध सर्वेक्षणांमधून भूमध्य सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात इंधनाचे साठे असल्याचे समोर आले आहे. त्यातील अधिकाधिक साठ्यांवर ताबा मिळविण्यासाठी तुर्कीने गेल्या वर्षापासून आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. भूमध्य सागरात ग्रीस व सायप्रसच्या हद्दीतील इंधनसाठ्यांवर तुर्कीने आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात व त्यानंतर तुर्कीने ‘रिसर्च शिप’ तसेच युद्धनौका पाठवून भूमध्य सागरात एकापाठोपाठ मोहिमा राबविण्यास सुरुवात केली होती. तुर्कीच्या या कारवायांवर आक्षेप घेऊन ग्रीसने भूमध्य सागरातील आपली संरक्षण तैनाती वाढविली होती.

त्यानंतर ग्रीसने फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती, इस्रायल, इजिप्त यासारख्या देशांबरोबर सामरिक सहकार्य मजबूत करण्यावरही भर दिला होता. युरोपिय महासंघ तसेच नाटोच्या माध्यमातून तुर्कीवर राजनैतिक दबाव टाकण्याचेही प्रयत्न केले होते. ग्रीसची ही आक्रमकता व आंतरराष्ट्रीय स्तरावरुन आलेल्या दडपणामुळे तुर्कीला माघार घेणे भाग पडले होते. अमेरिकेत झालेल्या सत्ताबदलानंतर बायडेन प्रशासनानेही आपले समर्थन ग्रीसला राहिल, असे संकेत दिल्याने तुर्की अडचणीत आल्याचे मानले जात आहे.

याच पार्श्‍वभूमीवर तुर्की व ग्रीसमधील तणाव पुन्हा एकदा वाढण्याचे संकेत मिळत आहेत. ग्रीसचे इतर देशांबरोबरील सामरिक सहकार्य तुर्कीला खुपत असून, राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन नवी चिथावणी देण्याचा प्रयत्न करतील, असा दावा ग्रीक विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी तुर्कीने सायप्रसनजिकच्या सागरी क्षेत्रात नवे जहाज पाठविल्याच्या घटनेकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. पुढील काळात तुर्की ग्रीसच्या सागरी हद्दीत मच्छिमारी नौका किंबा ‘फ्लोटिंग रिग’ पाठविण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.

leave a reply