भारताने घडविलेल्या आर्थिक सुधारणांचे अमेरिकेच्या उद्योगक्षेत्राकडून स्वागत

- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली – जानेवारी ते सप्टेंबर महिन्यापर्यंत भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार हे चीनचे स्थान अमेरिकेने पटकावले आहे. या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात भारत व अमेरिकेमधील व्यापार तब्बल ५० टक्क्यांनी वाढून २८ अब्ज डॉलर्सवर गेला आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अमेरिकेच्या दौर्‍यावर असताना, प्रसिद्ध झालेली ही माहिती लक्षणीय ठरते. भारताने आर्थिक आघाडीवर केलेल्या सुधारणांचे अमेरिका व अमेरिकेच्या उद्योगक्षेत्राने स्वागत केल्याचे सांगून त्यावर अर्थमंत्री सीतारामन यांनी समाधान व्यक्त केले आहे.

भारताने घडविलेल्या आर्थिक सुधारणांचे अमेरिकेच्या उद्योगक्षेत्राकडून स्वागत - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन अमेरिकेच्या दौर्‍यावर असून अमेरिकन उद्योगक्षेत्रातील मान्यवरांबरोबरील त्यांची चर्चा महत्त्वपूर्ण ठरते आहे. अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांच्याशी अर्थमंत्री सीतारामन यांची चर्चा पार पडली होती. तसेच जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशीही अर्थमंत्री सीतारामन यांची चर्चा संपन्न झाली. जी२० देशांच्या अर्थमंत्र्यांमधील बैठकीसाठी अमेरिकेच्या दौर्‍यावर गेलेल्या अर्थमंत्री सीतारामन यांच्या तब्बल २५ द्विपक्षीय चर्चा संपन्न झाल्याची माहिती दिली जाते.

या चर्चेमध्ये भारताने आर्थिक आघाडीवर केलेल्या सुधारणाचे स्वागत होत असल्याचे सीतारामन म्हणाल्या. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने तसेच अमेरिकन उद्योगक्षेत्रातील बड्या कंपन्यांनीही भारताने घडविलेल्या या सुधारणांची दखल घेऊन त्याचे स्वागत केले, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले. विशेषतः रेट्रोस्पेक्टीव्ह टॅक्स मागे घेण्याचा भारताने घेतलेला निर्णय हे फार मोठे सकारात्मक पाऊल असल्याचा दावा अमेरिकन कंपन्यांनी केला आहे. याची माहिती देऊन केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पुढच्या काळात भारतात फार मोठी गुंतवणूक येईल, असे संकेत दिले आहेत.

आपल्या अमेरिका दौर्‍याचा हेतू भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करणे हाच होता व त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केला. दरम्यान, भारताने आर्थिक आघाडीवर केलेल्या या सुधारणांचे परिणाम दिसू लागले असून भारत व अमेरिकेची व्यापारी भागीदारी अधिकाधिक भक्कम बनत चालल्याचे स्पष्ट होत आहे. या वर्षाच्या पाहिल्या नऊ महिन्यात चीनला मागे टाकून अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनला आहे.

लडाखच्या एलएसीवर चीनच्या घुसखोरीमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, भारताच्या चीनबरोबरील व्यापारावर विपरित परिणाम झाला होता. भारताने सीमावादाचा व्यापारावर परिणाम होऊ देऊ नये, असे आवाहन चीनकडून सातत्याने केले जात आहे. मात्र सीमेवर सौहार्द व शांतता प्रस्थापित केल्याखेरीज चीनला व्यापारात सवलत मिळणार नाही, असे भारत बजावत आहे. यामुळेच भारताचा चीनबरोबरील व्यापार कमी होत चालला असून त्याच प्रमाणात भारताचा अमेरिका व इतर देशांबरोबरील व्यापार वाढत असल्याची लक्षणीय बाब समोर आली आहे.

leave a reply