अमेरिका-इराणमधील अणुकरार इस्रायलसाठी बंधनकारक नाही

- इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू

जेरूसलेम – ‘इस्रायलच्या विनाशाच्या धमक्या देणार्‍या इराणबरोबर अमेरिकेने केलेल्या अणुकराराची आम्ही जबाबदारी घेणार नाही, हे आमच्या निकटतम मित्रांनी लक्षात ठेवावे. फक्त आमच्या विनाशाच्या घोषणा देणार्‍यांना त्यांच्या योजना अंमलात आणण्यापासून रोखण्याच्या योजनेशीच इस्रायल बांधिल असेल’, असा संदेश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला.

Advertisement

बुधवारी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे अमेरिका आणि इराणमध्ये अप्रत्यक्ष चर्चा सुरू झाली आहे. युरोपिय महासंघाच्या मध्यस्थीने सुरू झालेल्या या चर्चेमध्ये चीन, रशिया, ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. इराणबरोबरचा २०१५ सालचा अणुकरार पुनरुज्जीवित करण्यासाठी ही चर्चा सुरू असून अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने इराणवरील काही निर्बंध काढण्याची तयारी दाखविली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना तसे संकेत दिले.

इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी अमेरिका व इराणमध्ये सुरू असलेल्या या चर्चेवर आपली प्रतिक्रिया दिली. इस्रायलला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकण्याची धमकी देणार्‍या इराणबरोबर अमेरिकेने पुन्हा अणुकरार केलाच, तर तो इस्रायलसाठी बंधनकारक नसेल. कट्टरपंथी राजवटींबरोबरचे असे करार अखेरीस व्यर्थच ठरतात’, असे इस्रायलच्या पंतप्रधानांनी बजावले आहे.

आजच्या काळात इस्रायलच्या अस्तित्वाला धोकादायक असलेल्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या अधिकारांपासून इस्रायलला रोखणारा देश जगात अस्तित्त्वात नाही’, असा खरमरीत इशारा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी दिला. इस्रायलची मुख्य गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’चे प्रमुख योसी कोहेन हे लवकरच अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची भेट घेऊन अमेरिकेने इराणबरोबर अणुकरार करू नये, यासाठी कोहेन प्रयत्न करणार असल्याचा दावा इस्रायली वृत्तवाहिनीने केला. यासाठी कोहेन व्हाईट हाऊस येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, त्यांचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवॅन तसेच अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्‍यांची भेट घेणार असल्याची माहिती इस्रायली वृत्तवाहिनीने दिली. यावेळी मोसादचे प्रमुख अमेरिकेसमोर इराणच्या अणुकार्यक्रमासंबंधी काही पुरावे सादर करणार असल्याचे इस्रायली वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे.

अशा परिस्थितीत इस्रायलच्या पंतप्रधानांनी इराणबरोबरील अणुकरारावरून अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाला इशारा दिला आहे. या इशार्‍याच्या काही तास आधी रेड सी क्षेत्रात हेरगिरी करणार्‍या इराणच्या जहाजावर हल्ला चढविल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानंंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिलेला हा इशारा गंभीर परिणाम साधणारा असल्याचे दिसू लागले आहे. पुढच्या काळात आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी इस्रायल अमेरिकेचीही पर्वा न करता, इराणवर एकट्याने कारवाई करील, असा संदेश वेगवेगळ्या मार्गाने अमेरिकेला दिला जात आहे.

leave a reply