अवैधरित्या घुसखोरी करणार्‍या निर्वासितांना रोखण्यासाठी; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ‘मेक्सिको वॉल’चे बांधकाम सुरू केले

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या सुरक्षेला असलेल्या खर्‍या धोक्यांकडे दुर्लक्ष करून डोनाल्ड ट्रम्प पैशांचा चुराडा करणारी ‘मेक्सिको वॉल’ उभारत असल्याची जळजळीत टीका ज्यो बायडेन यांनी केली होती. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर पहिल्या काही आठवड्यातच ज्यो बायडेन यांनी अमेरिका-मेक्सिको सीमेवर उभारण्यात येत असलेल्या या सुरक्षा भिंतीचे बांधकाम बंद पाडले होते. पण आता या भिंतीचे काम नव्याने सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे बायडेन यांच्या प्रशासनाने मान्य केले आहे. याचा फार मोठा फटका राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना बसू शकतो.

Advertisement

मेक्सिकोच्या सीमेतून अमेरिकेत दाखल होणार्‍या अवैध निर्वासितांना रोखण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे ४६० मैल इतक्या सुरक्षा भिंतीचे बांधकाम केले होते. मात्र यावरून ट्रम्प यांना घणाघाती टीकेचा सामना करावा लागला होता. ह्या भिंतीची आवश्यकताच नसल्याची टीका झाली होती. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचार करताना बायडेन यांनी ट्रम्प यांची ही भिंत म्हणजे पैशांचा चुराडा आणि अमेरिकेला असलेल्या खर्‍याखुर्‍या अंतर्गत धोक्यांकडून दुसरीकडे लक्ष वळविण्याचा प्रयत्न असल्याचा ठपका ठेवला होता. आपण सत्तेवर आल्यानंतर या भिंतीचे बांधकाम बंद पाडू, अशी ग्वाही बायडेन यांनी दिली होती.

त्यानुसार राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर बायडेन यांनी सदर भिंतीचे काम रोखले होते. तसेच अमेरिकेत अवैधरित्या शिरकाव करणे हा शिक्षापात्र गुन्हा ठरविण्याचा ट्रम्प यांचा निर्णयही बायडेन यांनी फिरविला होता. यावर संतापलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी बायडेन यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. राष्ट्राध्यक्ष बायडेन अमेरिकेची सुरक्षा धोक्यात टाकत असल्याचे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी बजावले होते. पण बायडेन यांच्यावर या टीकेचा परिणाम झाला नव्हता.

मात्र यामुळे मेक्सिकोच्या सीमेतून अमेरिकेत होणारी घुसखोरी वाढली. घुसखोरांचे तांडे यामुळे अमेरिकेत शिरू लागले व त्यांना रोखण्यासाठी अमेरिकेच्या सुरक्षा दलांवर फार मोठा ताण येत असल्याचेही समोर येत आहे. इतकेच नाही तर या अवैध निर्वासितांच्या मुलांना वेगळ्या कॅम्पमध्ये ठेवण्याचा बायडेन प्रशासनाचा निर्णयही उलटला आहे. कारण हे कॅम्प मुलांनी भरून गेले असून इथे जागाच उरलेली नाही. अशा परिस्थितीतही काही उदारमतवादी नेते निर्वासितांना रोखू नका, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना करीत आहेत.

पण इथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालल्याचे लक्षात आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पुन्हा एकदा ‘मेक्सिको वॉल’चे बांधकाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच तसे आदेश येऊ शकतात, अशी माहिती अमेरिकेच्या होमलँ सिक्युरिटी विभागाचे मंत्री अलेजांद्रो मायोर्कस यांनी दिली. सुरूवातीला या भिंतीमध्ये असलेले ‘गॅप्स’ बुजविले जातील, असे मायोर्कस यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी ज्यो बायडेन यांचा ‘मेक्सिको वॉल’ला सरसकट विरोध नव्हता, अशी माहिती माध्यमांमधून दिली जात आहे. मात्र राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प उभारत असलेल्या ‘मेक्सिको वॉल’चा मुद्दा ऐरणीवर आणणारे ज्यो बायडेन आता या भिंतीचे काम पुढे नेत आहेत, हा ट्रम्प यांच्या धोरणांचा विजय असल्याचे दावे त्यांच्या रिपब्लिकन पक्षाकडून केले जाऊ शकतात. त्याचवेळी अजूनही या सुरक्षा भिंतीला विरोध करणारे उदारमतवादीही बायडेन यांना यावरून लक्ष्य करण्याची दाट शक्यता समोर येत आहे.

leave a reply