हॉंगकाँगच्या मुद्दयावर अमेरिकेची चीनला मोठा धक्का देण्याची तयारी

वॉशिंग्टन – चीनकडून प्रत्युत्तराची धमकी मिळाल्यानंतरही अमेरिकेने हॉंगकाँगच्या मुद्यावर चीनला मोठा धक्का देण्याची तयारी सुरु केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येत्या काही दिवसात चीनच्या विरोधात कठोर निर्णयाची घोषणा करू, असे म्हटले आहे. अमेरिकेच्या राजकीय वर्तुळातूनही ट्रम्प प्रशासनाने हॉंगकॉंग मुद्यावर आक्रमक निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील माजी राजदूत निक्की हॅले यांनी, हॉंगकॉंगबाबत कारवाई केली नाही तर पुढचा धोका तैवानला असेल, याची जाणीव करून दिली आहे.

चीनच्या संसदेचे अधिवेशन गुरुवारी संपत असून त्यापूर्वी हॉंगकॉंगवर लादण्यात येणाऱ्या ‘नॅशनल सिक्युरिटी लॉ’ला मान्यता मिळू शकते. चीनच्या संसदेतील मंजुरीनंतर जून महिन्यात हा कायदा हॉंगकॉंगमध्ये लागू होऊ शकतो. कोरोनाची साथ सुरु असतानाही हा कायदा लागू करण्यासाठी चीनने जोरदार तयारी केली असून प्रसंगी लष्कर उतरविण्याचेही संकेत दिले आहेत.

चीनचा हा हस्तक्षेप रोखण्यासाठी अमेरिका व ब्रिटनने पुढाकार घेतला असून चीनविरोधात मोठ्या कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. चीनच्या संसदेत कायद्याचा प्रस्ताव येण्यापूर्वीच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कठोर कारवाईबाबत वक्तव्य केले होते. त्यानुसार ट्रम्प प्रशासनाने हालचाली चालू केल्या असून परराष्ट्र विभाग व अर्थ विभागाच्या माध्यमातून कारवाई होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला असून अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे वक्तव्य त्याला पुष्टी देणारे ठरते. ‘हॉंगकॉंग मुद्यावरून चीनवर कारवाई करण्यासाठी महत्त्वाच्या हालचाली सुरू आहेत. हा आठवडा संपण्यापूर्वी मोठया कारवाईचा निर्णय जाहीर करीन’, असे ट्रम्प म्हणाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘स्पेशल स्टेटस’ रद्द करणे, चीनचे नेते व अधिकारी यांना प्रवेश बंदी आणि आर्थिक व व्यापारी निर्बंध यांचा कारवाईत समावेश असेल.

चीनविरोधात कारवाई करावी म्हणून अमेरिकेच्या राजकीय वर्तुळातूनही दबाव वाढू लागला आहे. अमेरिकेतील दोन्ही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी याची मागणी केली असून तातडीने कारवाई करावी असाही आग्रह धरला आहे. अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील माजी दूत निक्की हॅले यांनी तैवानची आठवण करून देत हॉंगकॉंग मुद्यावर कारवाईची मागणी केली आहे.

‘चीनने जबरदस्तीने हॉंगकॉंगवर ताबा मिळविल्यास त्याने अमेरिकेच्या हितसंबंधांना धोका उत्पन्न होईल. त्याचवेळी हॉंगकॉंग नंतर चीनची नजर तैवानकडे वळेल हे लक्षात ठेवायला हवे. हॉंगकाँगविरोधातील कायदा मंजूर झाल्यास अमेरिकेच्या संसदेने तातडीने हालचाल करून चीनवर निर्बंध लादून कठोर कारवाईसाठी कायदा करावा. हॉंगकॉंगची जनता अमेरिकेकडे आशेने पहात आहे, याची जाणीव ठेवा’, अशा शब्दात हॅले यांनी चीनला मोठा धक्का देण्याची आग्रही भूमिका घेतली आहे.

leave a reply