अमेरिकेची स्पेस फोर्स ‘डायरेक्टेड एनर्जी’वर काम करीत आहे – स्पेस फोर्सचे प्रमुख जनरल जे रेमंड

वॉशिंग्टन – अंतराळातील अमेरिका आणि मित्रदेशांचे हितसंबंध सुरक्षित राहिलेले नाहीत. चीन अंतराळाचे लष्करीकरण करून चीन अमेरिकेची जागा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा इशारा काही आठवड्यांपूर्वी अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’ने दिला होता. अंतराळातील चीनच्या या लष्करी आव्हानाला उत्तर देण्यासाठी अमेरिकेने देखील पावले उचलली आहेत. अंतराळातील आपल्या हितसंबंधाच्या सुरक्षेसाठी आणि या क्षेत्रातील आपले वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी अमेरिकेची स्पेस फोर्स ‘डायरेक्टेड एनर्जी सिस्टिम’वर काम करीत असल्याची माहिती स्पेस फोर्सचे प्रमुख जनरल जे रेमंड यांनी दिली.

जे रेमंड२०४५ सालापर्यंत अंतराळ क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासाठी चीनने स्वत:समोर लक्ष्य ठेवल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. चीनने ‘तियान्हे’ या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रासाठी अंतराळवीर रवाना करून त्यादिशेने पावले टाकल्याचा दावा केला जातो. चीनच्या महत्त्वाकांक्षा अंतराळातील अमेरिकेच्या हितसंबंधांसाठी धोकादायक ठरू शकतात, असे इशारे दिले जात आहेत. अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने अमेरिकन संसदेकडे याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच अंतराळातील अमेरिकेचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी मोठ्या आर्थिक तरतूदीची आवश्यकता असल्याची मागणीही नासाने समोर ठेवली आहे.

अमेरिकेच्या स्पेस फोर्स ऑपरेशन्सचे प्रमुख जनरल जे रेमंड यांनी सिनेट समितीसमोर बोलताना, अंतराळातील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. यामध्ये डायरेक्टेड एनर्जी सिस्टिमचा वापर बचावात्मक कारवाईसाठी करण्यात येईल, असे जनरल रेमंड यांनी स्पष्ट केले. ‘अंतराळातील उपग्रहांकडून मिळणार्‍या माहितीवर अमेरिका मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे व त्यांची सुरक्षा करणे आपली जबाबदारी आहे’, असा विश्‍वास स्पेस फोर्सच्या प्रमुखांनी व्यक्त केला. जनरल रेमंड यांनी डायरेक्टेड एनर्जी सिस्टिमबाबत महत्त्वाची माहिती सिनेट समितीसमोर दिल्याचा दावा केला जातो.

जे रेमंड

मात्र स्पेस फोर्सच्या प्रवक्त्यांनी देखील याबाबत अधिक तपशील माध्यमांमध्ये उघड करण्याचे टाळले. ‘चीन आणि रशियाकडे अमेरिकेच्या उपग्रहांचे नुकसान करण्याची किंवा नष्ट करण्यासाठी डायरेक्टेड एनर्जी सिस्टिम आहे. या धोक्याविरोधात अमेरिका देखील आपली तयारी करीत आहे’, असे स्पेस फोर्सच्या प्रवक्त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. याआधी अमेरिकेच्या ‘मिसाईल डिफेन्स एजन्सी’ने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांविरोधात लेझर वापरण्याबाबत संशोधन केल्याचे जाहीर केले होते.

साधारण दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या गुप्तचर विभाग ‘सीआयए’ने देखील चीनच्या डायरेक्टेड एनर्जी सिस्टिमबाबत इशारा प्रसिद्ध केला होता. चीनने उपग्रहभेदी क्षेपणास्त्रे आणि लेझर्सची चाचणी घेतली होती, याची आठवण सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी करून दिली होती. चीन लेझर्सच्या सहाय्याने अमेरिकेन उपग्रहांचे ऑप्टिकल सेंसर्स निकामी किंवा नष्ट करू शकतो, असा दावा बर्न्स यांनी केला होता. अंतराळातील अमेरिकेचा प्रभाव नष्ट करण्यासाठी चीनचे हे प्रयत्न सुरू असून अमेरिकेने यासाठी धोरणात्मक पावले उचलावी, असे बजावले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी देखील माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेस फोर्सबाबतच्या धोरणात बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

leave a reply