१९२९ सालच्या महामंदीनंतर पहिल्यांदाच अमेरिकेतील बेरोजगारी सर्वाधिक स्तरावर

१९२९ सालच्या महामंदीनंतर पहिल्यांदाच अमेरिकेतील बेरोजगारी सर्वाधिक स्तरावर

वॉशिंग्टन – १९२९ सालानंतर पहिल्यांदाच अमेरिकेतील बेरोजगारी सर्वाधिक स्तरावर पोहोचली आहे. कोरोनाव्हायरसमुळे अमेरिकेतील दोन कोटी साठ लाख जण बेरोजगार झाले असून अमेरिकेतील या वाढत्या बेरोजगारीवर जगभरातील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर, अमेरिकेला आणि पर्यायाने साऱ्या जगाला ‘दुसऱ्या महामंदी’चा सामना करावा लागेल, असा इशारा अर्थतज्ज्ञ देत आहेत.

अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, कोरोनाव्हायरसचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर सर्वात मोठा प्रभाव पडला आहे. गेल्या आठवड्यात सुमारे ४४ लाख अमेरिकन नागरिकांनी बेरोजगारांना मिळणाऱ्या सवलतींसाठी नोंदणी केली. तर गेल्या पाच आठवड्यांमध्ये तब्बल दोन कोटी साठ लाख नागरिक बेरोजगार झाल्याचे या माहितीतून स्पष्ट झाले. अमेरिकेतील एकूण नोकऱ्यांची संख्या पाहता, सहापैकी एक जण आपला रोजगार गमावित असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अमेरिकेतील या बेरोजगारीची तुलना १९२९ साली आलेल्या ‘ग्रेट डिप्रेशन’ अर्थात महामंदीशी केली जात आहे. १९२९ ते १९३३ या कालावधीत अमेरिका व जगावर हे महामंदीचे संकट कोसळले होते. अमेरिकेतील शेअरबाजारात झालेल्या पडझडीबरोबर या महामंदीची सुरुवात झाली होती. त्यावेळी दिड कोटी अमेरिकी नागरिकांनी आपली नोकरी गमावली होती. तर निम्म्या बँका बंद झाल्या होत्या. तर जागतिक जीडीपी उणे अंकात पोहोचला होता. त्याहून अधिक चिंताजनक परिस्थिती आता निर्माण झाल्याचा दावा अर्थतज्ज्ञ व विश्लेषक करीत आहेत.

“फक्त एखादा चमत्कारच ह्या आर्थिक संकटाचे रुपांतर ‘ग्रेट डिप्रेशन २’ मध्ये होण्यापासून टाळू शकतो”, असा इशारा जपानी वित्तसंस्थेचे संचालक ख्रिस रप्की यांनी दिला. गेल्या महिन्यातच रप्की यांनी अमेरिकेत १९२९ सालाप्रमाणे बेरोजगारीचे संकट ओढावेल, अशी शक्यता वर्तविली होती.

तर, व्यापकता आणि तीव्रतेचा विचार करायचा झाला तर, आत्ताचे आर्थिक संकट हे १९२९ सालच्या ‘ग्रेट डिप्रेशन’पेक्षाही अधिक मोठे असल्याचा दावा अर्थतज्ज्ञ मार्टिन वुल्फ यांनी केला आहे. त्याचबरोबर लॉकडाउन मागे घेऊन उद्योग-व्यवसाय सुरू करण्याच्या घाईत असलेल्या देशांना देखील वुल्फ यांनी इशारा दिला आहे. ‘अर्थव्यवस्था सावरण्यासाठी लॉकडाउन मागे घेतला आणि त्यानंतर कोरोनाव्हायरस अधिक पसरला तर त्यामुळे अधिक आर्थिक नुकसान होईल’, याची जाणीव वुल्फ यांनी करुन दिली आहे.

leave a reply