एफ-22 पॅसिफिकमधील सरावासाठी रवाना करून अमेरिकेचा चीनला इशारा

एफ-22वॉशिंग्टन – पॅसिफिक महासागर क्षेत्रातील गुआम बेटासाठी अमेरिकेने ‘एफ-22 रॅप्टर’ विमानांचे दोन स्क्वाड्रन्स रवाना केले. येत्या काही दिवसात सुरू होणार्‍या ‘ऑपरेशन पॅसिफिक आयर्न’ युद्धसरावासाठी ही तैनाती असल्याचा दावा केला जातो. पण पॅसिफिक क्षेत्रात एवढ्या मोठ्या संख्येने लढाऊ विमाने रवाना करून अमेरिकेने चीनला इशारा दिल्याचे माजी अधिकारी व लष्करी विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. दरम्यान, चीनबरोबरील तणाव वाढत असताना, अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन या महिनाअखेरीस फिलिपाईन्स, व्हिएतनाम आणि सिंगापूर या आग्नेय आशियाई देशांचा दौरा करणार असल्याची बातमी आहे.

काही तासांपूर्वी अमेरिकेच्या हवाईदलाने सुमारे 25 एफ-22 स्टेल्थ विमाने गुआम बेटावरील तीन हवाईतळांवर तैनात केली. त्याचबरोबर 10 एफ-15ई स्ट्राईक इगल्स लढाऊ, दोन सी-130जे हर्क्युलिस मालवाहू विमाने आणि सुमारे 800 जवान ‘ऑपरेशन पॅसिफिक आयर्न 2021’ सरावासाठी दाखल झाली आहेत. गुआम आणि टिनियान बेटांच्या क्षेत्रात आयोजित होणार्‍या या युद्धसरावासाठी आत्तापर्यंतची ही मोठी तैनाती मानली जाते. ‘पॅसिफिक हवाईदलाच्या क्षेत्रात एवढ्या मोठ्या संख्येने एफ-22ची तैनाती याआधी कधीच झाली नव्हती’, अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या पॅसिफिक हवाईदल कमांडचे प्रमुख जनरल केन विल्सबॅश यांनी दिली.

इंडो-पॅसिफिक क्षेत्राची जबाबदारी असलेले अमेरिकेचे लष्कर खतरनाक बनलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे, हे दाखवून देण्यासाठी ही तैनाती केली आहे. 2018 सालच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाच्या चौकटीत हा सराव आयोजित केला आहे’, असे अमेरिकेच्या पॅसिफिक कमांडने यावेळी जाहीर केले. एफ-22 रॅप्टर ही फिफ्थ जनरेशन अर्थात पाचव्या पिढीतील आणि जगातील अत्याधुनिक विमानांपैकी एक म्हणून ओळखली जातात. अमेरिकेच्या हवाईदलात अशी एकूण 180 विमाने आहेत. तर चीनकडे पाचव्या पिढीतील असल्याचा दावा केल्या जाणार्‍या ‘चेंगडू जे-20’ विमानांची संख्या अवघी 24 आहे.

एफ-22‘चीनच्या हवाईदलात पाचव्या पिढीतील जितकी विमाने आहेत, त्याहून अधिक विमाने अमेरिका कमीतकमी वेळेत या क्षेत्रात तैनात करू शकतो, हा संदेश अमेरिकेच्या पॅसिफिक हवाईदलाने चीनला दिला’, असा दावा अमेरिकेच्या पॅसिफिक कमांडच्या जॉईंट इंटेलिजन्स सेंटरचे माजी प्रमुख कार्ल शस्टर यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. तर या तैनाती व ऑपरेशन पॅसिफिक आयर्नद्वारे अमेरिका आपल्या मित्र आणि सहकारी देशांना आश्‍वस्त करीत असल्याचे शस्टर म्हणाले.

‘पहिल्या महायुद्धात अमेरिकेच्या हवाईदलाने अशीच क्षमता व सज्जता दाखवून दिली होती. चीन याचे अनुकरण करू शकत नाही. जर मी चीन असतो तर, अमेरिकेच्या या तैनातीकडे अधिक गांभीर्याने पाहिले असते. कारण ही साधारण नाही, तर फार मोठी तैनाती आहे’, असा इशारा अमेरिकेच्या हवाईदलाचे माजी अधिकारी लेफ्टनंट जनरल डॅन लिफ यांनी दिला.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या लष्करी हालचाली तीव्र झाल्या आहेत. जपान, तैवान यांना धमकावणार्‍या चीनने अमेरिकेच्या गुआम बेटांच्या दिशेने आपली विमानवाहू युद्धनौका रवाना केली होती. त्याचबरोबर आपली युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकांना जलसमाधी देतील, अशी धमकी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या लष्करी विश्‍लेषकांनी दिली होती. तर चीन आपल्या अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ करून त्यांची तैनाती करीत असल्याचे अहवाल प्रसिद्ध झाले होते. या पार्श्‍वभूमीवर, गुआम बेटांवर एफ-22 विमानांची तैनाती अमेरिकेने केली आहे.

leave a reply