ब्लॅक सीमध्ये ‘अ‍ॅम्फिबियस अ‍ॅसॉल्ट शिप’च्या तैनातीद्वारे अमेरिकेचा रशियाला इशारा

‘अ‍ॅम्फिबियस अ‍ॅसॉल्ट शिप’

वॉशिंग्टन/मॉस्को – गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका व रशियामध्ये वाढणारा तणाव अधिकच चिघळण्याचे संकेत मिळत आहेत. ‘ब्लॅक सी’मध्ये अमेरिका, युक्रेन व नाटो सदस्य देशांमध्ये करण्यात येणार्‍या युद्धसरावाला रशियाकडून तीव्र विरोध होत असून रशियाने आक्रमक हालचाली सुरू केल्याचे समोर आले आहे. रशियाच्या या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने ‘अ‍ॅम्फिबियस अ‍ॅसॉल्ट शिप’ ब्लॅक सी सागरी क्षेत्रात तैनात केली आहे. अमेरिकेच्या या कारवाईवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता विश्‍लेषकांनी व्यक्त केली.

जून महिन्याच्या अखेरीस युक्रेन व नाटोच्या 30 सदस्य देशांमध्ये ‘सी ब्रीझ2021’ हा नौदल सराव सुरू झाला आहे. दोन आठवडे चालणार्‍या या सरावात 30 युद्धनौका, 40 लढाऊ विमाने व पाच हजारांहून अधिक जवान सहभागी झाले आहेत. रशिया व पाश्‍चात्य देशांमध्ये विविध मुद्यांवर तणाव कायम असताना या सरावाचे आयोजन होत असल्याने रशियाने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिका, युक्रेन व नाटोचा हा सराव म्हणजे रशियाविरोधातील उघड चिथावणी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

‘अ‍ॅम्फिबियस अ‍ॅसॉल्ट शिप’या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या ‘सिक्स्थ फ्लीट’कडून ‘युएसएनएस युमा’ ही युद्धनौका तैनात करणे लक्ष वेधून घेणारी घटना ठरते. या युद्धनौकेवर हेलिकॉप्टर्ससाठी लाँच पॅड असून सशस्त्र वाहने ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा आहे. मिलिटरी सीलिफ्ट कमांडचा भाग असलेल्या या युद्धनौकेवरून युएस मरिन्सची पूर्ण तुकडी एखाद्या भागात तैनात करणे शक्य आहे. त्यामुळे स्वतंत्र लष्करी मोहिमेच्या दृष्टीने ही युद्धनौका अत्यंत महत्त्वाची ठरते.

‘अ‍ॅम्फिबियस अ‍ॅसॉल्ट शिप’अमेरिकेची ‘अ‍ॅम्फिबियस अ‍ॅसॉल्ट शिप’ ब्लॅक सीमध्ये दाखल होत असतानाच रशियाने पुन्हा या क्षेत्रात आपली बॉम्बर विमाने धाडल्याचे समोर आले आहे. बुधवारी रशियन ‘टीयु-22एम3 बॉम्बर्स’नी ब्लॅक सीच्या हवाईहद्दीतून घिरट्या घातल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. या बॉम्बर्सबरोबर ‘एसयु-30एम2’ ही लढाऊ विमानेही होती, असे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्याचवेळी रशियाने आपल्या दोन युद्धनौका भूमध्य सागरी क्षेत्रातून ‘ब्लॅक सी’मध्ये माघारी बोलावल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे. यात ‘अ‍ॅडमिरल एसेन’ या विनाशिकेचा तसेच ‘मोस्कव्हा’ या ‘मिसाईल क्रूझर’चा समावेश आहे.

दरम्यान, रशियाच्या लढाऊ विमानांनी अमेरिकी नौदलाचे ‘पी-8 पोसायडन’ या टेहळणी विमानाला रोखल्याचा दावा रशियाच्या ‘नॅशनल डिफेन्स कंट्रोल सेंटर’ने केला आहे. अमेरिकेने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

leave a reply