महागाई रोखण्यासाठी व्हेनेझुएलाकडून चलनातील सहा शून्य कमी करण्याची योजना

सहा शून्य कमीकॅराकस – सतत सहा वर्षे मंदीत असणारी अर्थव्यवस्था व वर्षभरात तब्बल दोन हजार टक्क्यांनी वाढलेली महागाई यावर उपाय म्हणून आपल्या चलनव्यवस्थेतील सहा शून्य कमी करण्याची योजना व्हेनेझुएला सरकारने मांडली आहे. या योजनेनुसार, ऑक्टोबर महिन्यापासून १०० बोलिव्हरची नोट सर्वाधिक रक्कम ठरणार असून त्याचे प्रत्यक्षातील मूल्य १० कोटी बोलिव्हर असणार आहे. याबरोबरच व्हेनेझुएलाची मध्यवर्ती बँक डिजिटल करन्सी सुरू करणारी असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

२०१८ सालापासून व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेची मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. संयुक्त राष्ट्रसंघटना व इतर जागतिक संघटनांनी दिलेल्या विविध अहवालांनुसार, व्हेनेझुएलात अराजकसदृश परिस्थिती असून जवळपास ५० लाख नागरिकांनी देश सोडल्याचे सांगण्यात येेते. गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले असून त्यामुळे इंधनक्षेत्र, पर्यटन, खनिज क्षेत्र या सर्वांची वाताहत झाल्याचे मानले जाते.

यासाठी व्हेनेझुएलाचे हुकुमशहा निकोलस मदुरो यांची धोरणे जबाबदार असल्याचे समोर आले आहे. मदुरो यांच्या धोरणामुळे देशात राजकीय अस्थैर्य असून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. त्यात कोरोनाच्या साथीची भर पडल्याने परिस्थिती अधिकच बिघडल्याचे मानले जाते. गेली काही वर्षे देशात महागाई भयावह प्रमाणात वाढत असून यावर्षी महागाई तब्बल २,३०० टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात येते. अवघ्या पाच लिटर पाण्यासाठी ७४ लाख बोलिव्हर इतकी प्रचंड रक्कम मोजावी लागत आहे. एका अमेरिकी डॉलरसाठी अब्जावधी बोलिव्हर मोजावे लागत आहेत.

सहा शून्य कमीया पार्श्‍वभूमीवर, व्हेनेझुएला सरकारने पुन्हा एकदा आपल्या चलनाचे मूल्य सावरण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या १३ वर्षांमध्ये तिसर्‍यांदा चलनातील शून्य हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी व्हेनेझुएलाचे दिवंगत हुकुमशहा ह्युगो चावेझ यांच्या कार्यकाळात २००८ साली तीन शून्य कमी करण्यात आले होते. त्यानंतर मदुरो यांनी २०१८ साली पाच शून्य कमी केले होते. आता सहा शून्य कमी करण्याचा प्रस्ताव ऑक्टोबर महिन्यापासून लागू होईल, असे सांगण्यात येते.

घसरती अर्थव्यवस्था व महागाई यावर मात करण्यासाठी गेल्या वर्षी व्हेनेझुएला सरकारने क्रिप्टोकरन्सीचेही सहाय्य घेतले होते. मात्र हा उपायही फारसा यशस्वी ठरला नसल्याचे नव्या योजनेवरून दिसून येते. क्रिप्टोकरन्सी अपयशी ठरल्यानंतर आता व्हेनेझुएलाच्या मध्यवर्ती बँकेने डिजिटल करन्सी सुरू करण्याचेही संकेत दिले आहेत. मात्र या प्रयत्नांना यश मिळण्याची फारशी शक्यता नसल्याचे दावे विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, व्हेनेझुएला सरकारकडून अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाशी बोलणी करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेने निर्बंध कमी केल्यास अर्थव्यवस्था सुधारेल, या उद्देशाने या हालचाली सुरू असल्याचे मानले जाते.

leave a reply