‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या विस्तारवादी धोरणाचा व्हिएतनामकडून निषेध

‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या विस्तारवादी धोरणाचा व्हिएतनामकडून निषेध

हनोई – ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या विस्तारवादी धोरणाचा व्हिएतनामने कडक शब्दात निषेध नोंदविला आहे. चीनने धोरण बदलले नाही तर त्याचे परिणाम संभवतात, असे व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले असून हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करण्याची तयारीही व्हिएतनामने केली आहे.

जगभरात कोरोनाव्हायरसची साथ धुमाकूळ घालत असताना चीन मात्र अरबी समुद्रापासून ते ‘साऊथ चायना सी’पर्यंतच्या सागरीक्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी म्हणून याकडे पाहत आहे. जगभरातील देश या साथीचा मुकाबला करण्यात गुंतलेले असताना चीन ‘साऊथ चायना सी’मधील बेटांवरील आपला बेकायदेशीर ताबा अधिकृत करण्यासाठी पावले उचलीत आहे. या बेटांवरील प्रशासकीय व्यवस्था बदलून त्याला चीनच्या जिल्ह्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, यावर व्हिएतनामकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली.

‘ज्या पॅरासेल आणि स्प्राटले बेटांबाबत निर्णय घेत आहे, त्या बेटांवर व्हिएतनामचा सार्वभौम अधिकार असल्याचे कायदेशीर आणि ऐतिहासिक पुरावे व्हिएतनामकडे आहेत. या बेटांवरुन आणि सागरी क्षेत्रातून चीनने माघार घ्यावी’, अशी मागणी व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. अन्यथा आपल्या बेटांच्या हक्कांसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचे सहकार्य घेण्याचे व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले आहे. पॅरासेल आणि स्प्राटले बेटांवर सैन्य, क्षेपणास्त्रे, रडार तैनात केल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले होते. आपल्या बेटांवरील चीनचा ताबा आणि त्याचे लष्करीकरण, यांचा मुद्दा व्हिएतनामने याआधीही उचलून धरला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चीन व व्हिएतनाममधील तणाव वाढत चालला आहे.

काही दिवसांपूर्वी ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात चीनच्या गस्तीनौकांनी व्हिएतनामच्या मच्छिमार जहाजाला धडक दिली होती. या घटनेनंतर फिलिपाईन्सने व्हिएतनामला पाठिंबा जाहीर करुन चीनच्या या क्षेत्रातील आक्रमकतेवर टीका केली होती. तर गेल्या आठवड्यात या सागरी क्षेत्रात चीन आणि मलेशियाची जहाजे आमनेसामने आली होती. त्यामुळे ‘साऊथ चायना सी’च्या मुद्यावरुन चीनला तीव्र विरोध होऊ लागला आहे.

leave a reply