सुरक्षादलांच्या सतर्कतेमुळे 26/11 सारखा घातपात टळला

- पंतप्रधान मोदी यांच्याकडून सुरक्षादलांची प्रशंसा

नवी दिल्ली – जम्मू-काश्‍मीरमध्ये होणाऱ्या पंचायत निवडणुकीच्या आधी 26/11 सारखा भयंकर हल्ला घडविण्याचा पाकिस्तानचा कट भारताच्या सुरक्षा दलांनी उधळला. गुरुवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या चकमकीत ठार झालेल्या चार ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यावरून ही बाब समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांचे कारस्थान हाणून पाडणाऱ्या सुरक्षा दलांचे कौतुक केले आहे. या चकमकीनंतर पंतप्रधानांनी उच्चस्तरिय सुरक्षाविषयक बैठकीचे आयोजन करून सुरक्षेचा आढावा घेतल्याचे वृत्त आहे.

घातपात

ठार झालेल्या ‘जैश’च्या चार दहशतवाद्यांकडून सुमारे 11 ‘एके-47 रायफल्स’, 29 ग्रेनेडस्‌, तीन पिस्तूले यासह फार मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. मुंबईवरील 26/11 हल्ल्याच्या स्मरणदिनी अशाच स्वरुपाचा भयंकर हल्ला घडविण्याचे कारस्थान या दहशतवाद्यांनी आखले होते. जम्मू-काश्‍मीरमधील शैक्षणिक संस्था, तसेच पंचायतीच्या निवडणुकीला लक्ष्य करण्याचा या दहशतवाद्यांचा इरादा असावा, अशी शक्यता जम्मू-काश्‍मीरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र सुरक्षा दलांच्या जवानांनी नागरोटा इथे या दहशतवाद्यांना वेळीच रोखले आणि त्यामुळे हा अनर्थ टळला.

सुरक्षा दलांच्या जवानांची नागरोटा येथील ही चकमक सुमारे तीन तास सुरू होती. यात हे चारही दहशतवादी ठार झाले. याची दखल घेऊन पंतप्रधानांनी सुरक्षा दलांच्या जवानांनी दाखविलेले उच्च कोटीचे शौर्य आणि व्यावसायिकता याची प्रशंसा केली. या जवानांनी दाखविलेली सतर्कता आणि पराक्रमामुळे जम्मू-काश्‍मीरमधील लोकशाहीच्या प्रक्रियेवरील भयंकर हल्ल्याचा कट हाणून पाडता आला, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. या दहशतवाद्यांनी जम्मू-काश्‍मीरमध्ये होणाऱ्या पंचायत निवडणुकीला लक्ष्य करण्याचा कट आखला होता, हे पंतप्रधानांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होत आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस जम्मू व काश्‍मीरमध्ये पंचायत निवडणूक सुरू होणार असून 19 डिसेंबर रोजी या निवडणुकीचा अंतिम टप्पा पार पडेल. 22 डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीला स्थानिकांकडून फार मोठा प्रतिसाद मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पाकिस्तान हवालदिल बनला आहे. कारण कलम 370 हटवून भारताने जम्मू-काश्‍मीरच्या जनतेवर अत्याचार सुरू केल्याचा अपप्रचार पाकिस्तान करीत आहे. यासाठी आपला सारा जोर लावणाऱ्या पाकिस्तानचे पितळ या पंचायत निवडणुकीतील स्थानिकांच्या सहभागामुळे उघडे पडू शकते.

यामुळे पाकिस्तानचे लष्कर, आयएसआय तसेच दहशतवादी संघटना जम्मू व काश्‍मीरमध्ये भयंकर दहशतवादी हल्ले घडविण्यासाठी धडपडत आहेत. इथे घातपात झाल्यानंतर ते स्थानिक काश्‍मिरी तरुणांनी घडविल्याचा प्रचार करण्याची तयारीही पाकिस्तानने करून ठेवली आहे. मात्र भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानचा हा कट हाणून पाडला आहे. म्हणूनच संतापलेल्या पाकिस्तानच्या माध्यमांनी नागरोटा येथे ठार झालेल्या दहशतवाद्यांचा उल्लेख काश्‍मिरी तरुण असा करून भारतावर जहरी टीका केली होती. काश्‍मीरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराकडून सुरू असलेला गोळीबार देखील याच भयंकर कटाचा भाग आहे. या गोळीबाराच्या आड जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवादी घुसविण्यासाठी पाकिस्तानचे लष्कर जीवाचे रान करीत आहे.

पाकिस्तानच्या या कटकारस्थानाच्या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरिय सुरक्षाविषयक बैठकीचे आयोजन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्यासह सदर बैठकीत गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी असल्याचे सांगितले जाते.

leave a reply