इराणकडून अणुकराराच्या नियमांचे उल्लंघन सुरूच

बर्लिन – इराणने युरेनियम मेटलच्या निर्मितीसाठी आवश्यक साहित्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. सदर माहिती इराणनेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाला कळविली आहे. ‘युरेनियम मेटल’च्या निर्मितीसाठी पाऊल उचलून इराणने अणुकरारातील नियमांचे आणखी एकदा उल्लंघन केल्याची चिंता आंतरराष्ट्रीय माध्यमे व्यक्त करीत आहेत. दरम्यान, युरेनियम मेटलचा वापर अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी केला जातो, असा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

‘युरेनियम मेटल’वर संशोधन आणि विकास करण्यासाठी इराणने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी अणुप्रकल्पात आवश्यक साहित्यांची जुळवाजूळव सुरू आहे’, अशी माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने एका पत्रकाद्वारे जाहीर केली. तर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगातील इराणचे राजदूत काझेम घरिब अबादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, युरेनियमच्या इंधनावर काम सुरू झाले आहे. यामुळे इराण प्रगत देशांच्या पंक्तीत जाऊन बसल्याचा दावा अबादी यांनी केला. पण युरेनियम मेटलच्या निर्मितीसाठी इराणने उचललेले पाऊल गंभीर तसेच अणुकराराचे उल्लंघन असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

२०१५ साली इराण आणि पाश्‍चिमात्य देशांमध्ये झालेल्या अणुकरारानुसार, युरेनियम मेटलवर कुठल्याही प्रकारचे संशोधन करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. युरेनियम मेटलवर संशोधन करणे या कराराचे उघड उल्लंघन ठरते. कारण युरेनियमच्या मेटलचा वापर एका अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे युरेनियम मेटलबाबत इराणने अणुऊर्जा आयोगाला दिलेली माहिती इराणची पाठराखण करणार्‍या देशांना अस्वस्थ करणारी ठरत आहे. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणने उचलेल्या पावलांवर टीका केली आहे. ‘इराणने उचललेले पाऊल चुकीचा संदेश देणारे असून यामुळे परस्परांवरील विश्‍वासाला तडे जाऊ शकतात’, असे जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले. तसेच ‘२०१५ सालच्या अणुकरारात सहभागी झालेले इतर देश हा करार वाचविण्यासाठी वचनबद्ध आहेत. अमेरिकेतील भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन देखील नव्याने अणुकरार करण्यासाठी तयार आहेत. असे असताना इराणने अणुकराराच्या नियमांचे उल्लंघन करणे सोडून द्यावे’, असे आवाहन जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले.

दोन दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष राफेल ग्रॉसी यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाला सावध केले होते. २०१५ सालच्या अणुकरारातून माघार घेतल्यानंतर, इराण अतिशय वेगाने युरेनियमचे संवर्धन करू लागला आहे. ते पाहता, इराणबरोबरील अणुकरार वाचविण्यासाठी आपल्याकडे महिने नाही तर अवघे काही आठवडे शिल्लक असल्याचे ग्रॉसी म्हणाले होते. त्याचबरोबर इराण युरेनियमचे संवर्धन २० टक्क्यांपर्यंत नक्की नेईल, असा खात्रीपूर्वक दावा ग्रॉसी यांनी केला होता.

यासाठी ग्रॉसी यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाचा वेग आणि इराणकडे असलेल्या यंत्रणेचा दाखला दिला होता. या दोन्हीच्या सहाय्याने इराण महिन्याभरात १० किलो किंवा त्याहून थोडे अधिक युरेनियमचे संवर्धन पूर्ण करू शकतो, अशी चिंता ग्रॉसी यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, इराणने देखील आपल्यावरील निर्बंध मागे घेण्यासाठी अमेरिकेला महिन्याभराची मुदत दिली आहे. या मुदतीत अमेरिकेने निर्बंध मागे घेतले नाही तर इराणचा अणुकार्यक्रम अधिक तीव्र होईल, असे संकेत इराणने दिले आहेत.

leave a reply