भारताकडून व्हिसा आणि प्रवासी नियम शिथिल

नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिसा आणि हवाई प्रवासावर लावण्यात आलेले निर्बंध केंद्रीय गृहमंत्रालयाकडून शिथील करण्यात आले आहेत. सरकारच्या निर्णयामुळे पर्यटन वगळता इतर कारणासाठी भारतात येण्यास आणि दुसऱ्या देशात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारताकडून व्हिसा आणि प्रवासी नियम शिथिलमार्च महिन्यात देशात लोकडाऊन जाहीर करतानाच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता अनलॉक अंतर्गत हे नियम शिथिल करण्यात आले आहेत. ‘ओसीआय’ कार्डधारक म्हणजेच परदेशात राहाणाऱ्या भारतीय नागरिकांना आणि ‘पीआयओ’ म्हणजे भारतीय मूळ असलेल्या नागरिकांना भारतात येण्यास आणि भारतातून इतर देशात जाण्यासाठी हवाई प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. परदेशी नागरिकांसाठीही नियम शिथिल करण्यात आले आहेत. या नागरिकांना हवाई किंवा जलमार्गाद्वारे देशात प्रवेश देण्यात येत असल्याचे गृहमंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

व्यापार, परिषद, नोकरी, शिक्षण, संशोधन आणि वैद्यकीय कारणासाठी हे नियम शिथिल करण्यात आले आहे. मात्र पर्यटक व्हिसा मिळू शकणार नाही. त्यावरील निर्बंध कायम राहणार आहेत. वंदे भारत मिशन, एअर ट्रान्सपोर्ट बबल व्यवस्था किंवा नागरी उड्डयन मंत्रालयाने परवानगी दिलेल्या कोणत्याही नॉन शेड्यूल व्यावसायिक उड्डाणांद्वारे हा प्रवास करिता येईल. मात्र ही परवानगी देताना सर्व प्रवाशांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या विलगीकरण आणि इतर आरोग्य नियम व कोविद -१९ बाबतीतील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

leave a reply