रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन इस्रायलचे निकटतम, सच्चे मित्र

- इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट

सच्चे मित्रसोची – ‘रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन इस्रायल आणि इस्रायली जनतेचे अतिशय निकटतम, सच्चे मित्र आहेत. गेली २० वर्षे किंवा त्याहून अधिक वर्षांमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशियाचे इस्रायलबरोबरील संबंध भक्कम करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे’, अशी तारीफ करून इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी रशियाबरोबरचे सहकार्य अधोरेखित केले. तर रशिया व इस्रायलमध्ये विशेष सहकार्य असून उभय देशांच्या जनतेतील अतिशय खोल संबंधांवर ते आधारलेले असल्याचे राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले. रशिया व इस्रायलमधील राजनैतिक सहकार्याला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर, इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी शुक्रवारी रशियाचा विशेष दौरा करून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेऊन प्रदिर्घ चर्चा केली. यावेळी आर्थिक, विज्ञानविषयक व सांस्कृतिक मुद्यांवर चर्चा पार पडल्याचे बेनेट म्हणाले. त्याचबरोबर उभय देशांमधील व्यापार वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे इस्रायलच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाच्या रेड आर्मीने हिटलरच्या नाझी लष्करावर मिळविलेल्या विजयाचा विशेष उल्लेख पंतप्रधान बेनेट यांनी केला. ‘दुसर्‍या महायुद्धात रशियन जनता व रेड आर्मीने नाझी जर्मनीवर विजय मिळविण्यासाठी केलेली अफाट कामगिरी इस्रायली जनता अजूनही विसरलेली नाही’, असे सांगून बेनेट यांनी इस्रायलमध्ये उभारल्या जात असलेल्या संग्रहालयाची माहिती दिली. तसेच इस्रायलमधील रशियन भाषिकांचा विशेष उल्लेख पंतप्रधान बेनेट यांनी केला.

‘इस्रायलमध्ये रशियन बोलणारे रशियाचे दहा लाख दूत आहेत. ते त्यांची कार्यसंस्कृती, मानसिकता आणि त्यांनी मिळविलेले यश याच्यासह इस्रायलच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत’, असे इस्रायलचे पंतप्रधान पुढे म्हणाले. रशियन राष्ट्राध्यक्षांनी देखील याच मुद्यावर सुरुवात केली. रशिया व इस्रायलमधील सहकार्य अद्वितीय असून उभय देशांमधील जनतेत असलेल्या अतिशय खोल संबंधांवर ते आधारलेले असल्याचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्पष्ट केले.

इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी रशियाबरोबर प्रस्थापित केलेले संबंधच यापुढील दोन्ही देशांमधील सहकार्याचा आधार असेल, असे रशियन राष्ट्राध्यक्ष पुढे म्हणाले. त्याचबरोबर इराणचा अणुकार्यक्रम आणि सिरियातील इराणची लष्करी आक्रमकता रोखण्यावरही इस्रायल व रशियाच्या नेत्यांमध्ये चर्चा पार पडली. यासंबंधीचे सगळेच तपशील माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले नाहीत. पण सिरियातील इस्रायलच्या हवाई हल्ल्यांच्या आड रशिया येणार नाही, अशी हमी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिल्याची माहिती इस्रायलच्या अधिकार्‍याने दिली.

इस्रायलचे पंतप्रधान रशियाच्या दौर्‍यावर येण्याआधी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्यांच्यासाठी लक्षवेधी संदेश पाठविला होता. यामध्ये ज्यूविरोध, तिरस्कार व वांशिक संघर्षाच्या विरोधात रशिया व इस्रायल दृढपणे एकत्र उभे असल्याचे पुतिन म्हणाले होते. रशिया व इस्रायलमधील ऐतिहासिक सहकार्याला उजाळा देऊन रशियन राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलला येत्या काळातील आव्हानांसाठी एकजूट करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले होते.

दरम्यान, इस्रायलच्या पंतप्रधानांनी गेल्याच महिन्यात अमेरिकेचा दौरा केला होता. या दौर्‍यात पंतप्रधान बेनेट यांनी इराणच्या अणुकार्यक्रमापासून इस्रायलसह आखाती क्षेत्र आणि जगाला असलेल्या धोक्याचा इशारा होता. अशा परिस्थितीत अमेरिकेने इराणबरोबर अणुकरारावर चर्चा करू नये, अशी मागणी इस्रायली पंतप्रधानांनी केली होती. पण त्यांना अमेरिकेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, असे दावे केले जातात.

त्या पार्श्‍वभूमीवर, रशियाबरोबरील इस्रायलची वाढती जवळीक लक्षवेधी बाब ठरते. बायडेन प्रशासनाच्या बेताल परराष्ट्र धोरणांमुळे आखातातील इस्रायल व सौदी सारखे मित्रदेश अमेरिकेपासून दुरावल्याचे सांगून याचा लाभ रशिया घेत असल्याची टीका अमेरिकेच्या माजी राजनैतिक अधिकार्‍यांनी केली होती. पण बायडेन प्रशासन ही टीका गंभीरतेने घेत नसल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply